जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 07:56 IST2025-05-03T07:56:28+5:302025-05-03T07:56:45+5:30
काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅलीकाढून जल्लोष

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाने देशातील जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी केवळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दडपणाखाली घेतला आहे. हा एका प्रकारे काँग्रेसचा नाही तर जनतेचा विजय आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेताच, काँग्रेसने राजधानीत काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढत विजयाचा जल्लोष केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत, आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, व काँग्रेसचे इतर ओबीसी समिती, अनुसूचित जाती-जमाती समितीचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन मिठाई वाटली.
काँग्रेसने गेले कित्येक वर्षे जातीनिहाय जनगणना करावी हा विषय लावून धरला होता. राहुल गांधींनी वारंवार केंद्र सरकारला याची आठवण करून दिली होती. आम्ही जेव्हा ही मागणी करायचो, तेव्हा भाजपवाले आमची मस्करी करायचे. आता शेवटी केंद्र सरकारने आमच्या मागण्यापुढे गुडघे टेकलेच आहेत. मात्र आम्ही यावर न थांबता याची अमंलबजावणी होईपर्यंत यावर लक्ष ठेवणार आहोत, असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.
या रॅलीमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलनाची गरज का भासली याविषयी स्पष्ट केले. आंदोलनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना खूप दिवसांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची संधी मिळाली. त्यांनी यावेळी घोषणा देत लक्ष वेधून घेतले.
गांधी सर्वसामान्यांचे नेते
संसदेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी हे लहान लोकांचे नेते आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेदरम्यान त्यांनी ४५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. महात्मा गांधीनंतर केवळ राहुल गांधीने असे केले आहे. यातून त्यांना वाटले होते की मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. या अनुषंगाने जनगणनेची मागणी त्यांनी केली होती. यापुढे देखील आम्ही सरकारला योग्य दिशा दाखविण्यास काम करणार आहोत, असे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.