गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आगीच्या वेळी अडकलेल्या लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू असतानाच क्लबचे मालक असलेले फरार आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा यांनी थायलंडला जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने मंगळवारी लुथरा बंधूंना ट्रान्झिट अटकपूर्व जामीन देण्यास तात्काळ नकार दिला. गोवा पोलिसांनी न्यायालयात या अर्जाला तीव्र विरोध केला. आता या प्रकरणावर आज पुढील सुनावणी होणार आहे.
क्लबमध्ये आग लागली तेव्हा (७ डिसेंबर रोजी पहाटे १:१७ वाजता) बचावकार्य सुरू असतानाच, लुथरा बंधूंनी थायलंडचे तिकीट बुक केले होते. पोलिसांनी यामागचा अर्थ असा लावला आहे की, आग लागताच त्यांनी देश सोडून पळून जाण्याची योजना आधीच आखली होती. मात्र, न्यायालयात त्यांच्या वकिलांनी या परदेश दौऱ्याचे कारण व्यवसाय बैठक असल्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी आणि क्लब पार्टनर अजय गुप्ता याला गोवा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला गोव्यात आणले आहे. डीआयजी वर्षा शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश आणि सुरक्षा नियमांची तपासणी
या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी पर्यटन मंत्री रोहन खौटे, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. क्लब, रेस्टॉरंट्स, सभागृह आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुरक्षा नियमावलीवर यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळले.
दुर्घटनेनंतर इतर क्लबचीही चौकशी सुरू झाली आहे. पेडणे, बार्डेझ आणि तिसवाडी तालुक्यातील अनेक क्लब, बार आणि व्यावसायिक आस्थापनांची सुरक्षा उपाययोजना, आपत्कालीन तयारी आणि नियमांचे पालन तपासण्यासाठी संयुक्त तपासणी देखरेख समितीने पाहणी केली आहे.
उत्तर गोव्यात फटाक्यांवर बंदी
उत्तर गोव्यातील नाईटक्लब, बार, हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळांमध्ये फटाके, स्पार्कलर, स्मोक जनरेटर आणि आग/धूर निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर १० डिसेंबर २०२५ पासून पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, आगीशी संबंधित तांत्रिक तपास, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम आणि दोषी अधिकारी/व्यवस्थापनांवर कारवाईची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे.
Web Summary : While Goa nightclub fire victims fled, owners booked Thailand tickets. Court denied anticipatory bail. A partner was arrested. Firework ban imposed.
Web Summary : गोवा नाइट क्लब में आग लगने पर, मालिकों ने थाईलैंड के टिकट बुक किए। अदालत ने अग्रिम जमानत खारिज की। एक भागीदार गिरफ्तार। आतिशबाजी पर प्रतिबंध।