...म्हणून ती विधानसभा निवडणूक मी हरलो: दामू नाईक; फातोर्डाच्या विकासाविषयी चर्चेस तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:40 IST2025-06-23T12:39:49+5:302025-06-23T12:40:51+5:30
येथील रवींद्र भवनात एका कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाईक उपस्थित होते.

...म्हणून ती विधानसभा निवडणूक मी हरलो: दामू नाईक; फातोर्डाच्या विकासाविषयी चर्चेस तयार
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : 'वेळ्ळी, नावेली, मडगाव आणि फातोर्डा या मतदारसंघांची २०१२ साली फेररचना झाली. पूर्वीच्या फातोर्डा मतदारसंघात कोंब व हाउसिंग बोर्ड या दोन ठिकाणी जास्त हिंदू मतदारांचा समावेश होता. ते दोन्ही भाग फातोर्डामधून वगळून एक कुडतरी मतदारसंघात, तर दुसरा मडगाव मतदारसंघात घालण्यात आला. त्यामुळे माझा पराभव झाला,' असा दावा फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केला. फातोर्डा मतदारसंघातील गेल्या १३ वर्षातील प्रकल्पांविषयी चर्चेस ठाम आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
रविवारी येथील रवींद्र भवनात एका कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाईक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'फातोर्डा मतदारसंघात माझ्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आले. त्यानंतर एकतरी आदर्श प्रकल्प फातोर्डा मतदारसंघात आला नाही. मी आव्हानावर आजही ठाम आहे. फातोर्डा मतदारसंघातील आदर्श प्रकल्प दाखवा. मी कधीही चर्चेला तयार आहे. नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी फातोर्डा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात फातोर्डा मतदारसंघातील जिल्हाधिकारी कार्यालय, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ यांसारखे मोठे प्रकल्प आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत झाले.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचा नामोल्लेख न करता 'कोणी फुकटचे श्रेय घेऊ नये. जर कुणी प्रकल्प आणला असेल तर आपण आव्हान देत आहोत' असे म्हटले होते. नाईक यांनी आव्हानावर आजही ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आज जो फातोर्डा मतदारसंघ आहे तो माझ्या कारकिर्दीतील विकासकामांवर उभा आहे.
ते ओपन सिक्रेट...
दामू नाईक म्हणाले की, फातोर्डा मतदारसंघाचा जो विकास झाला, तो पंतप्रधान मोदींमुळे. विरोधकांनी इतिहास व वास्तव समजून घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी. माझा पराभव करण्यासाठी विरोधी आमदारांना कोणी पाठिंबा दिला, हे ओपन सिक्रेट आहे.
त्यांनी मंत्रिपद भोगले, पण...
माझा विषय केवळ फातोर्डा मतदारसंघापुरता मर्यादित नाही. गोवाभाजपामय करणे हा प्रयत्न आहे. त्यात फातोर्डा मतदारसंघही येतो. विरोधक माझ्यावर रवींद्र भवन, जिल्हा इस्पितळ या प्रकल्पांसंबधी बोट दाखवतात त्यांना मी सांगू इच्छितो की, मी केवळ प्रकल्पांचे स्वागत केले. त्या प्रकल्पांचे बांधकाम मी केलेले नाही, हे त्यांनी ध्यानी घ्यावे. मी कधी मंत्री, उपमुख्यमंत्री झालो नाही. सहयोगींनी मंत्रीपद भोगले, परंतु फातोर्डा मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. तो आजही तसाच आहे.