'युनिटी मॉल'वरून तणाव; विरोधक घोषणाबाजी करत विधानसभेत सभापतींच्या हौद्यात धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:36 IST2026-01-14T08:35:27+5:302026-01-14T08:36:35+5:30
कामकाज तहकूब; दुसरीकडे चिंबल पंच सदस्यांना ग्रामस्थांनी विचारला जाब; पोलिसांचा लाठीमार

'युनिटी मॉल'वरून तणाव; विरोधक घोषणाबाजी करत विधानसभेत सभापतींच्या हौद्यात धावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पावरून मंगळवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. विरोधकांनी थेट सभापतींच्या हौद्यात धाव घेतल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने सभापती गणेश गावकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. तर, दुसरीकडे आक्रमक चिंबलवासीयांनी काल प्रकल्पावरून व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी पंच शंकर नाईक यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सभापती गावकर यांनी अशी वागणूक सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. शिस्तभंग सुरूच राहिला तर नियम २८९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
सांताक्रुझचे आमदार रुदोल्फ फर्नाडिस यांनी युनिटी मॉल प्रकल्पासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारची भूमिका मांडली. मात्र, सरकारची उत्तरे असमाधानकारक असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि पुन्हा गदारोळ सुरू झाला.
प्रकल्प तत्काळ रद्द करा
युनिटी मॉल प्रकल्पामुळे पर्यावरणीय जैवविविधतेचे गंभीर नुकसान होणार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली. गेल्या १७ दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत असताना सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
पंच सदस्य शंकर नाईक यांनी व्हिडीओ काढत जे आरोप केले. त्यामुळेच लोक आक्रमक झाले. काल ते पंचायतीत आले तेव्हाही त्यांची देहबोली लोकांचा अवमान करण्यासारखीच होती. त्यांनीच लोकांना आक्रमक व्हायला प्रवृत्त केल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.
चिंबलवासीय भडकले
चिंबल परिसरातील युनिटी मॉल प्रकल्पाविरोधातील शांततेत सुरू असलेले आंदोलन काल अचानक भडकले. सोमवारी पंच शंकर नाईक यांनी सोशल मीडियावर आंदोलनकर्त्यांवर आरोप केले आणि पैसे घेऊन आंदोलन सुरू असल्याचे म्हटल्याने नागरिक आक्रमक झाले. त्यामुळेच काल पंच आणि लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा केला.
जवळपास १७ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि सुरुवातीपासून ते शांततेत चालत होते. मात्र सोमवारी शंकर नाईक यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी केला, ज्यात आंदोलनकर्त्यांवर आरोप करून त्यांचा अवमान केला आणि आंदोलन पैशासाठी चालले असल्याचे सांगितले. या व्हिडीओने लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याने काल धक्काबुक्कीचा प्रकार घडला. सरपंच संदेश शिरोडकर आणि इतर पंच सदस्यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर असल्याचे सांगितले आणि तिथून निघून गेले, मात्र शंकर नाईक माफी मागण्यास तयार नसल्यामुळे लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यात धक्काबुक्की झाली आणि अगदी महिलांवरही पंच धावून गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यात काही नागरिक जखमी झाले.
पंचांमुळे लोक आक्रमक : खोलकर
गेले १७ दिवस आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत आणि असेच आमचे धोरण होते. पण पंचसदस्य शंकर नाईक यांनी काल व्हिडीओ काढत जे आरोप केले त्यामुळेच लोक आक्रमक झाले. काल ते पंचायतीमध्ये आले तेव्हाही त्यांची देहबोली लोकांचा अवमान करण्यासारखीच होती. त्यांनीच लोकांना आक्रमक व्हायला प्रवृत्त केल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.
मी लोकांसोबत : सरपंच
युनिटी मॉल प्रकल्पाला मी परवाना दिलेला नाही. जेव्हा ही फाइल आमच्याकडे आली होती तेव्हा आम्ही परवाना नाकारला होता. पण त्यांनी बीडीओ आणि पंचायत संचालकांकडून याबाबत आदेश मिळवला व त्यांनी आम्हाला परवाना देण्याची सूचना केली. आम्ही लोकांसोबत आहोत. जर लोकांना युनिटी मॉल नको तर आम्हाला पण नको. आज, बुधवारी याबाबत पंचायतीत बैठक घेणार असून, पुढे काय करायचे याचा निर्णयदेखील घेऊ, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांशी आज चर्चा : मुख्यमंत्री
युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले. त्यानुसार आज, बुधवारी सायंकाळी ४ वाजता पर्वरी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार असून, आंदोलनकर्त्यांच्या शंका ऐकून घेतल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी सरकारी आणि लोकहिताचे प्रकल्प असले की, हमखास विरोध केला जातो, अशी खंत व्यक्त करत विकासविरोधी मानसिकता थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
युनिटी मॉलचे बांधकाम अधिसूचित पाणथळ क्षेत्राबाहेरच होणार असून तोयार तळ्याला कोणतीही हानी होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. प्रकल्पासाठी रस्ते रुंदीकरण किंवा घरे पाडली जाणार नाहीत, तसेच स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री.