अमित पाटकरांना हटविल्यानंतर काँग्रेससोबत युतीची चर्चा!; RG नेते मनोज परब यांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:22 IST2025-12-28T09:21:49+5:302025-12-28T09:22:18+5:30
आमदार एकत्र येण्यासाठी तयार होते; पण सांताक्रूझ मतदारसंघासाठी 'ते' अडून बसल्याने युती फिसकटली

अमित पाटकरांना हटविल्यानंतर काँग्रेससोबत युतीची चर्चा!; RG नेते मनोज परब यांनी स्पष्ट केली भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपला पराभूत करायचे असेल, तर युतीला पर्याय नाही, हे झेडपीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना हटविल्याशिवाय आपण काँग्रेससोबत युतीबाबत बोलणारही नाही, अशी स्पष्ट भूमिका काल, शनिवारी रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडली.
विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीविषयी मनोज परब म्हणाले की, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने त्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले. काँग्रेसमधील अनेक नेत्यांना युती करण्याची इच्छा असतानाही केवळ प्रदेक्षाध्यक्ष पाटकर यांच्या अट्टहासामुळेच ही युती फिस्कटली, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या एका विधानावरही मनोज परब यांनी काल प्रतिक्रिया दिली. आरजीचे गोव्यासाठी काय योगदान आहे, हे ढवळीकर यांना समजावून सांगण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करू. या कार्यक्रमात ढवळीकरांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल, असेही परब यांनी स्पष्ट केले.
आम्ही तयार आहोत...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष युतीसाठी तयार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही युतीची चर्चा सुरू केली होती. काँग्रेसच्या आमदारांना आमच्यासोबत युती करावी, असे वाटत होते. मात्र, अध्यक्षांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आता विधानसभा निवडणुकीची तयारी करणे गरजेचे आहे. मात्र, जोपर्यंत पाटकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तोपर्यंत युतीची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे परब यांनी ठामपणे सांगितले. ते प्रदेशाध्यक्ष असताना आपण युतीबाबत चर्चा करायलाही जाणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.
आरजीचा दावा ठरला खरा..
जिल्हा पंचायत निवडणुकीत आरजी युतीसाठी तयार असतानाही सांताक्रूझ मतदारसंघावर काँग्रेस अड्डून बसल्याने युती झाली नव्हती. या मतदारसंघावर आरजीने जोरदार दावा केला होता व युती फिस्कटल्यानंतरही हा मतदारसंघ जिंकण्यात आरजीला यश मिळाले. त्यामुळे या मतदारसंघावरील आरजीच्या दावा वास्तववादी ठरला आहे.
काँग्रेसच्या आमदारांनी झेडपीसाठी लावली ताकद
जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गोव्यात आठ जागा जिंकल्या असल्या, तरी या जागा पक्ष संघटनेच्या जोरावर मिळाल्या असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही, असे राजकीय अभ्यासकांना वाटते.
सासष्टीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या वैयक्तिक प्रभावाच्या जोरावर हे मतदारसंघ जिंकले आहेत. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी खोला मतदारसंघात विजय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर हळदोणे 3 मतदारसंघात आमदार कार्ल्स फेरेरा यांनी आपले दोन्ही झेडपी मतदारसंघ जिंकले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षसंघटना आणि पक्षनेतृत्वाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.