मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:03 IST2025-04-01T13:02:29+5:302025-04-01T13:03:51+5:30

आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला अप्रत्यक्षरीत्या अशा प्रकारे अपमानित करण्याची ही गोव्यातील पहिलीच वेळ आहे.

such an insult to maharashtrawadi gomantak party mago goa party | मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

म.गो. पक्षाचे नेते भाजपविरोधात किंवा भाजप सरकारच्या निर्णयांविरुद्धही बोलले नव्हते. तरीदेखील गेले काही दिवस भाजपकडून मगोपच्या नेतृत्वाचा जो अपमान केला जात आहे, ते पाहता हिंदू बहुजन समाजाचे मनोरंजन होतेय की बहुजनांना राग येतोय, हे पुढील काळात कळेल. मांद्रे मतदारसंघात आणि काल परवा प्रियोळ मतदारसंघात झालेल्या भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री सावंत यांनी केलेली विधाने ऐकून ढवळीकर बंधूंना वेदना झाल्या असतील; पण पर्याय नाही. सत्तेत राहायचे असेल तर काही अपमान सहन करावे लागतात. अवहेलनेचे दुःख गिळावे लागते. कदाचित दिवस बदलतील, अशी आशा ठेवावी लागते. युती मान्य नसेल तर चला, तिकीट काढा अशा शब्दांत मुख्यमंत्री सावंत यांनी आता मगोपला फटकारले आहे. 

आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला अप्रत्यक्षरीत्या अशा प्रकारे अपमानित करण्याची ही गोव्यातील पहिलीच वेळ आहे. अजून विधानसभा निवडणूक दीड-दोन वर्षांवर आहे. समजा निवडणूक सहा महिन्यांवर आली असती आणि मुख्यमंत्र्यांनी युतीच्या घटक पक्षाविरुद्ध विधाने केली असती तर ती समजून घेता आली असती. मात्र, मंत्रिमंडळ बैठकांमध्ये व विधानसभेतही जे नेते एकत्र बसतात, ते पक्षाच्या मेळाव्यात मात्र एकमेकांविरुद्ध बोलतात हे पाहून गोंयकारांनाही आश्चर्याचा धक्का बसत असेल. 

मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गेल्या पंधरवड्यात सावईवेरे येथे महिला मेळावा घेतला होता. प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे त्यावेळी दुखावले होते. शिवाय सभापती तथा भाजप नेते रमेश तवडकर यांच्याशी मगोपच्या नेत्यांची खास युती झालेली आहे. दीपक ढवळीकर व तवडकर यांची मैत्री दाट झाल्याने मुख्यमंत्री सावंत व मंत्री गावडे यांची नाराजी वाढली असावी. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मिक्स भाजी व खतखते झाले आहे, ही तवडकर यांची टीका मुख्यमंत्र्यांना आवडली नव्हतीच. तवडकर सभापती असले तरी, थोडे जास्त उत्साहात वावरतात हे काही मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे. 

प्रियोळ मतदारसंघात जाऊन श्रमधाम योजनेंतर्गत घरे बांधणे आणि त्यावेळी दीपक ढवळीकर यांना सोबत घेणे ही तवडकर यांची कृती गोविंद गावडे यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. भाजप व मगोप यांच्यातील संघर्ष हा या पार्श्वभूमीवर निर्माण झाला. मात्र, मगोप नेतृत्वाचा अपमान करत राहणे हे भाजपला राजकीयदृष्ट्या कदाचित आज परवडत असेल. कारण मगोपची शक्ती मडकई, शिरोडा, फोंडा, प्रियोळ, मांद्रे, पेडणे अशा मतदारसंघांपुरतीच मर्यादित आहे, असे भाजपला वाटते. 

डिचोली, पेडणे येथे मगोकडे आता प्रबळ उमेदवारही नाही. मगोपचे संघटनात्मक काम कधी पक्षाने वाढविले नाही. शिवाय मगोपचे आमदार जीत आरोलकर मनाने पक्षापासून अगोदरच दूर झाल्याने ढवळीकर यांची राजकीय शक्ती कमी झाल्याची कल्पना मुख्यमंत्री सावंत यांना आली आहे. तशात गोविंद गावडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रेम आणि सुदिन ढवळीकर यांच्याविषयी नाराजी हा भाग आहेच. भाजप व मगोप ही युती दुभंगली किंवा तुटली तर भाजपची फार मोठी हानी होणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांना सध्याच्या टप्प्यावर वाटते. 

२०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनादेखील तसेच वाटायचे. शिवाय पर्रीकर केंद्रात मंत्री होते आणि निवडणुकीवेळी नितीन गडकरी या बलाढ्य नेत्याकडे गोवा भाजपची जबाबदारी होती. तरीदेखील भाजपचा दारूण पराभव झाला होता. फक्त तेरा मतदारसंघ पदरात पडले होते. निवडणुकीवेळी स्थिती वेगळी असते आणि त्यावेळी कोणते मतदार कसा राग काढतील हे सांगता येत नाही. 

२०२२ साली सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यास भाजपचे स्थानिक नेतृत्व तयार नव्हते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने त्यावेळी ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घ्याच असा आदेश दिला होता. त्यामुळे ढवळीकर मंत्री झाले. मुख्यमंत्र्यांना मात्र त्यावेळी हे सक्तीचे मंत्रिपद आवडले नव्हते. सावंत यांची जीत आरोलकर यांच्याशी झालेली दाट मैत्रीही ढवळीकर बंधूंना आवडली नाही. यामुळे आता भाजप-मगोपचे भांडण वाढेल आणि युती तुटेल अशा टप्प्प्यावर सगळा मामला आला आहे. तरीदेखील भाजपचे केंद्रीय नेतृत्व काय तो अंतिम निर्णय घेईल.

Web Title: such an insult to maharashtrawadi gomantak party mago goa party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.