बिट्स पिलानीत विद्यार्थिनीची आत्महत्या; १४ महिन्यांत सहा विद्यार्थ्यांचा धक्कादायक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:12 IST2026-02-03T10:12:05+5:302026-02-03T10:12:53+5:30
वेर्णा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

बिट्स पिलानीत विद्यार्थिनीची आत्महत्या; १४ महिन्यांत सहा विद्यार्थ्यांचा धक्कादायक मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पस काल पुन्हा एका आत्महत्येच्या घटनेने हादरला. कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय वैष्णवी जीतेश (बंगळुरू) हिने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेनेमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेर्णा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
वैष्णवी ही बिट्स पिलानीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. रविवारी रात्री तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे कॅम्पसमधील इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत कॅम्पसमधील काही कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वैष्णवीच्या खोलीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्यात आला असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवागृहात पाठवला. त्यानंतर तिच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली. आज, सोमवारी वैष्णवीचे पालक गोव्यात आले आहेत. वैष्णवीने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कॅम्पसमधील तणाव, शैक्षणिक दबाव, समुपदेशन सुविधांचा अभाव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मृत्यूंची मालिका
- डिसेंबर २०२४ : बीई कम्प्युटर सायन्स आणि एमएससी केमिस्ट्रीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ओम प्रियन सिंग याने आत्महत्या केल्याची घटना.
- मार्च २०२५ : तृतीय वर्षाचा द्विपदवी विद्यार्थी अथर्व देसाई याने आपले जीवन संपवले.
- मे २०२५ : एमएससी (केमिस्ट्री) व बीई इलेक्ट्रीकल व इन्स्ट्रुमेंटेशनचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कृष्णा कर्सेरा मृतावस्थेत आढळून आला.
- ऑगस्ट २०२५ : इकॉनॉमिक्स आणि कम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी कुशाग्र जैन याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत सापडला.
- सप्टेंबर २०२५ : एमएससी फिजिक्सच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ऋषी नायर याचा संशयास्पद मृत्यू.