गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:05 IST2026-01-31T09:05:27+5:302026-01-31T09:05:56+5:30
नबीन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देताना संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल, शुक्रवारी आमदारांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणूक केवळ वर्षभरावर येऊन ठेपली असून, त्यानुषंगाने नबीन यांनी महत्त्वाचे मागदर्शन करीत निवडणुकीसाठी रणनितीही ठरवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नबीन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देताना संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग व इतर उपस्थित होते. येथील भाजप कार्यालयात नबीन यांचे आगमन झाले, तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. आधी कोअर कमिटी व नंतर आमदारांसमवेत बैठक झाली.
मगोचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर यांनीही त्यांची भेट घेतली.
याबाबत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार नबीन यांनी आमदारांचीही बैठक घेऊन २०२७च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनितीही ठरवली. नबीन यांनी आमदारांशी चर्चा केली. आगामी निवडणुकीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले तसेच लोकांची कामे कशी पुढे न्यावीत. संघटनात्मक कामांना प्राधान्य देऊन ती कामे कशी पूर्ण करता येतील, याबाबत सूचना केल्या.
सावंत म्हणाले, 'नबीन हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर प्रथमच गोव्यात आलेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. उद्या शनिवारी ते ताळगाव येथे कम्युनिटी हॉलमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतील.' प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, 'कोअर कमिटीच्या बैठकीत नबीन यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे व त्यानुसार पुढील काळात आम्ही काम करणार आहोत.'
कार्यकर्ता मेळावा आज
नबीन हे आज, शनिवारी सकाळी उत्तर गोवा जि. पं. अध्यक्षा रेश्मा बांदोडकर यांच्या पिळर्ण येथील निवासस्थानी भेट देतील. १० वाजता म्हापसा येथे भाजप उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात भेट देतील. सकाळी ११:३० वा. मीरामार येथे दिवंगत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर स्मृतिस्थळ व भाऊसाहेब बांदोडकर स्मृतिस्थळास भेट देतील. दुपारी ११:४५ वाजता ताळगावात मेळावा होईल.
संघटन मजबूत करा : नबीन
दरम्यान, नितीन नबीन यांनी 'कार्यकर्ते हाच भाजपचा खरा कणा आहे. पक्षाची ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, 'सेवा, संघटन आणि समर्पण या त्रिसूत्रीवर भाजप काम करत असून, प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे.' गोव्यात भाजप संघटन आणखी मजबूत केले जावे, अशी सूचना त्यांनी केली. संघटन, विस्तार आणि बूथ स्तरावरील मजबुतीकरणावर त्यांनी बैठकीत सविस्तर चर्चा केली.