झेडपीसाठी कारभारी ठरले!; प्रदेशाध्यक्षांकडून नावे जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:48 IST2025-12-29T07:47:41+5:302025-12-29T07:48:23+5:30
अध्यक्षपदासाठी उत्तरेतून रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ देसाई यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब; नामदेव च्यारी, अंजली वेळीप उपाध्यक्षपदाचे उमेदवार

झेडपीसाठी कारभारी ठरले!; प्रदेशाध्यक्षांकडून नावे जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी काल भाजपकडून चौघांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी रेश्मा संदीप बांदोडकर तर दक्षिणेसाठी सिद्धार्थ गावस-देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २९ रोजी अर्ज भरण्यात येणार असून ३० रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ३० डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ३१ रोजी सचिवालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल, रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत सर्वानंद भगत, माजी खासदार विनय तेंडुलकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर, सिद्धार्थ गावस देसाई उपस्थित होते.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी रेईश मागूश मतदारसंघातून निवडून आलेल्या रेश्मा संदीप बांदोडकर, तर होंडा मतदारसंघातून निवडून आलेले नामदेव च्यारी हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असतील. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी शेल्डे येथून निवडून आलेले सिद्धार्थ गावस देसाई आणि उपाध्यक्षपदासाठी बार्सेतून निवडून आलेल्या अंजली अर्जुन वेळीप यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. भाजपचे आघाडीचे घटक असलेल्या मगोपसह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. बैठकीला मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे त्यांच्या निवडून आलेल्या तिन्ही सदस्यांसह उपस्थित होते.
सुनील जल्मी भाजपसोबत : दामू
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, मगो पक्ष हा भाजप युतीचा घटक असून मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपल्या तिन्ही सदस्यांचा भाजपला पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे. यामुळे दक्षिण जिल्हा पंचायत स्तरावरही भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. याशिवाय काही अपक्ष उमेदवारांनीही भाजपला पाठिंबा दिला असून यात सुनील जल्मी यांचा समावेश आहे, अशी माहितीही नाईक यांनी दिली.
दोन्ही जिल्हा पंचायतीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांचे उमेदवार जाहीर करण्यासाठी काल पणजीत पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष दिल्लीला
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच पक्षाचे सरचिटणीस आज, २९ रोजी दिल्लीस जाणार आहेत. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांसह इतर नेत्यांना भेटणार आहेत.