विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:44 IST2025-12-26T09:43:15+5:302025-12-26T09:44:03+5:30
२०२७ पूर्वी 'माझे घर' योजना पूर्ण करणार

विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून प्रत्येक घरात समृद्धी पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय असून, 'माझे घर' ही महत्त्वाकांक्षी योजना २०२७ च्या निवडणुकीपूर्वी शंभर टक्के यशस्वी केली जाईल. आता झेडपी निवडणूक झाली असून, कार्यकर्त्यांनी उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
नावेली-साखळी येथे आयोजित भाजपच्या भव्य स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. पाळी मतदारसंघातील जिल्हा पंचायत निवडणुकीत सुंदर नाईक यांनी तब्बल ९,३०० मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवल्यानंतर हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत नवनिर्वाचित सदस्य सुंदर नाईक, सुलक्षणा सावंत, स्वाती माईणकर, नावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, आमोणा सरपंच सागर फडते, कुडणे सरपंच बाबला मळीक, भाजप अध्यक्ष रामा नाईक, गोपाळ सुर्लकर, गौरवी नाईक, पाळीचे सरपंच संतोष नाईक, सई गावडे, सुभाष मळीक, विश्वंभर गावस, पांडुरंग कुट्टीकर उपस्थित होते.
नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक यांनी आपल्या मनोगतात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "पुढील पाच वर्षे प्रत्येक कार्यकर्ता हा जिल्हा पंचायत सदस्य आहे, या भावनेने मी काम करणार आहे," असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना ९,२०० पेक्षा अधिक मते मिळवून देण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कार्यक्रमाचे स्वागत रामा नाईक यांनी केले. गोपाळ सुर्लीकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन संतोष मळीक यांनी, तर आभार संजय नाईक यांनी मानले. स्नेहमेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री म्हणून गेल्या सहा वर्षात ज्या-ज्या योजना आणि घोषणा केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप कार्यकर्ते आणि मतदारांनी सर्व जुने रेकॉर्ड मोडले असून, मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष मतदारसंघात फिरता न आले, तरी कार्यकर्त्यांनी प्रचाराची जबाबदारी यशस्वीपणे पेलल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सर्व बूथ प्रमुख, प्रभारी आणि पंचायत सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.