काही लोकांना आणखी पर्रीकर नकोत : उत्पल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:34 IST2025-11-20T09:34:39+5:302025-11-20T09:34:39+5:30
पक्ष जर पर्याय देऊ इच्छित नसेल तर आणखी काय करायचे?

काही लोकांना आणखी पर्रीकर नकोत : उत्पल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काही लोकांना आणखी पर्रीकर नकोत, अशी खंत व्यक्त करीत उत्पल पर्रीकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. उत्पल म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून लढलो. सहा हजारांपेक्षा जास्त मते मला मिळाली. त्यामुळे पक्षाकडून काहीतरी वेगळा विचार होईल, असे मला वाटले होते. परंतु तशी काही चिन्हे दिसत नाहीत.
काही लोकांना आणखी पर्रीकर नकोत. त्यामुळेच मला महापालिका निवडणुकीत पॅनेल उतरवावे लागत आहे. पणजीतील बेकायदा कृत्यांवर मी नेहमीच आवाज उठवलेला आहे. पक्ष जर पर्याय देऊ इच्छित नसेल तर आणखी काय करायचे?
महापालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेल विरोधात उत्पल पर्रीकर आपले पॅनेल उभे करून उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार ठरणार आहे. राज्यातील वाढते दरोडे, खून याबाबत बोलताना उत्पल म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकच जर विधानसभेत बसून कायदे करू लागले तर जनतेने आणखी कोणती बरे अपेक्षा करावी?