सोहमचा पाचवा गुन्हा प्रौढवयात; दोषी ठरल्यास ७ वर्षांचा कारावास शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:37 IST2026-03-31T07:37:06+5:302026-03-31T07:37:42+5:30

मित्रांना सांगितलेल्या कथांमुळे फुटले बिंग

soham naik fifth crime as an adult 7 years in prison possible if convicted | सोहमचा पाचवा गुन्हा प्रौढवयात; दोषी ठरल्यास ७ वर्षांचा कारावास शक्य

सोहमचा पाचवा गुन्हा प्रौढवयात; दोषी ठरल्यास ७ वर्षांचा कारावास शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी: कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित सोहम नाईक याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याच्यावर सोमवारी पाचवा गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणात तो पूर्णपणे अडकला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा गुन्हा घडला तेव्हा सोहम अल्पवयीन नव्हता. त्यामुळे न्यायालयात तो दोषी ठरल्यास, त्याला बाल गुन्हेगार न मानता 'प्रौढ गुन्हेगार' मानले जाईल आणि या गुन्ह्यासाठी त्याला ७ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

लैंगिक अत्याचार प्रकरणात सोहमविरुद्ध आतापर्यंत नोंदविण्यात आलेले पहिले चार गुन्हे त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी केले होते. ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे असले तरी, त्यावेळी तो अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या तांत्रिक बाबींमुळे त्याला काही प्रमाणात संरक्षण मिळण्याची शक्यता होती. मात्र, पाचवा गुन्हा करून तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेने सोहमवर हा पाचवा गुन्हा नोंदविला. यामध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा ठपका ठेवण्यात आला असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ७४ ते ७६ अंतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. या प्रकरणात तक्रारदार पीडित महिला आणि संशयित सोहम हे दोन्ही प्रौढ असल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी दिली.

सोहमविरुद्धचे आतापर्यंतचे गुन्हे

सोहमवर नोंदविण्यात आलेला पहिला गुन्हा प्रसारमाध्यमांच्या वृत्ताची आणि बातमीदाराच्या तक्रारीची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता. दुसरा गुन्हा दोन पीडित मुलींच्या तक्रारींनंतर 'गोवा बाल कायदा' आणि 'पोक्सो' कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला, ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत. चौथा गुन्हा हा तिसऱ्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला असून, त्यामध्ये संशयिताचे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवाद आढळल्याने आयटी कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. आता नोंदविलेला पाचवा गुन्हा लैंगिक अत्याचाराचा असून, यामध्ये सोहम प्रौढ असल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे.

निर्लज्जपणे मित्रांना कारनामे सांगायचा सोहम

संशयित सोहम नाईक याने केवळ अश्लिल कृत्य केले असे नव्हे, तर हे कारनामे केल्यानंतर तो अतिशय निर्लज्जपणे आपल्या मित्रांसमोर त्याचे वर्णन करायचा. सोहमच्या या सवयीमुळे पीडित मुलींची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असे. त्याने आपल्या मित्रांना सांगितलेल्या या कथाच अखेर पीडितांपर्यंत पोहोचल्या. स्वतःची झालेली बदनामी आणि सोहमचे कृत्य सहन न झाल्याने या पीडित मुली व महिला तक्रारी करण्यासाठी पुढे आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सोहमच्या अटकेस बाल न्यायालयाची मंजुरी

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली संशयित सोहम नाईक याला अटक करण्यास येथील बाल न्यायालयाने पोलिसांना परवानगी दिली आहे. वास्तविक, याप्रकरणी सोहमला गुन्हे शाखेकडून यापूर्वीच ताब्यात घेऊन अटक केली असली तरी कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी आणि तपासाला अधिक बळकटी देण्यासाठी न्यायालयाची ही विशेष परवानगी महत्त्वाची मानली जात आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहमवर 'गोवा बाल कायदा' आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. संशयित आधीच पोलिसांच्या ताब्यात असतानाही, बाल न्यायालयाकडून मिळालेल्या या आदेशामुळे आता पोलिसांना त्याची रीतसर कोठडी मिळवून सखोल चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तपासातील तांत्रिक अडथळे दूर झाले असून, पोलिस आता पुराव्यांची अधिकृतपणे जुळवाजुळव करणार आहेत. हे प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने कायद्यानुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.
 

Web Title : सोहम का वयस्क के रूप में पांचवां अपराध; दोषी पाए जाने पर 7 साल की सजा।

Web Summary : यौन उत्पीड़न के मामले में गिरफ्तार सोहम नाइक की मुश्किलें बढ़ीं, पांचवां आरोप लगा। अब वयस्क होने पर, दोषी पाए जाने पर 7 साल की जेल हो सकती है। पिछले आरोप नाबालिग रहने के दौरान लगे थे।

Web Title : Soham's fifth crime as adult; faces 7 years if convicted.

Web Summary : Soham Naik, arrested in a sexual assault case, faces increased trouble with a fifth charge. Now an adult, conviction could mean a 7-year prison sentence. Previous charges occurred when he was a minor.