सेणावली - वेर्णा येथे वृक्षाने घेतला चारचाकी चालकाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 18:55 IST2020-08-04T18:54:11+5:302020-08-04T18:55:15+5:30
वृक्ष कोसळल्याने चारचाकीच्या आत चिरडून दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडलेल्या ४३ वर्षीय सुनील रामानंद नाईक हा फार्तोडा, मडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती वेर्णा पोलिसांकडून प्राप्त झाली.

सेणावली - वेर्णा येथे वृक्षाने घेतला चारचाकी चालकाचा बळी
वास्को: मंगळवारी (दि.४) सकाळी दक्षिण गोव्यातील सेणावली, वेर्णा येथील रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे जंगली वृक्ष मूळातून उन्मळून येथून जाणा-या ‘आल्तो’ चारचाकीवर कोसळल्याने या वाहनातून प्रवास करणारा चालक जागीच ठार झाला. वृक्ष कोसळल्याने चारचाकीच्या आत चिरडून दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडलेल्या ४३ वर्षीय सुनील रामानंद नाईक हा फार्तोडा, मडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती वेर्णा पोलिसांकडून प्राप्त झाली.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.४५ च्या सुमारास सदर घटना घडली. सेणावली महामार्गाच्या बाजूला असलेले वृक्ष कोसळत असल्याची जाणीव येथील काही लोकांना होताच त्यांनी येथून जाणा-या वाहनांना अडवण्यास सुरुवात केली. ‘आल्तो’ चारचाकीने (जीए ०८ इ ३६९१) फार्तोडाहून वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामासाठी जात असलेल्या सुनील नाईक यांच्या लक्षात सदर वृक्ष कोसळत असल्याचे आले नाही. तो त्याच्या वाहनाने वृक्षाच्या खाली असलेल्या रस्त्यावर पोहोचला, तेव्हास सदर भलेमोठे वृक्ष मूळातून उन्मळून त्याच्या चारचाकीवर कोसळले. वृक्ष कोसळल्याने चारचाकीच्या आत असलेला सुनील वाहनात अडकल्याचे येथे असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
वृक्ष चारचाकीवर कोसळल्याने सुनिल यांना बाहेर काढण्यास कठीण ठरत असल्याने नंतर वेर्णा पोलीस तसेच वेर्णा अग्निशामक दलाला माहीती देण्यात आली. माहीती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चारचाकीवर कोसळलेले वृक्ष कापून आत अडकलेल्या सुनिल नाईक यांना बाहेर काढल्याची माहिती पोलीसांनी दिली. वृक्ष कोसळल्याने सुनिल चारचाकीत चिरडून मरण पोचल्याचे नंतर उघड झाल्याची माहीती वेर्णा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली. वेर्णा पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करून नंतर मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. ज्या वेळी वृक्ष कोसळले तेव्हा वादळी वा-यासहीत मुसळधार पावस पडत होता अशी माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
मंगळवारी सकाळी मरण पोचलेले सुनील नाईक हे वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘ट्युलीप’ या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते अशी माहीती पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्याकडून प्राप्त झाली. सकाळी सुनिल कामावर येण्यासाठी फार्तोडाहून निघाले असता सेणावली येथे घडलेल्या या घटनेत त्यांचा दुर्देवी अंत झाला. वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.