भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:44 IST2025-10-06T10:43:03+5:302025-10-06T10:44:25+5:30
सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोव्याचे अस्तित्व भाजप-काँग्रेसमुळे संकटात सापडले आहे. सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये गुप्त करार झाला आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी वेळीच यांचा डाव ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी, घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणून गोमंतकीयांनी गोमंतकीयांचे राज्य प्रास्तापित करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमूख दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
आपच्या उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांची काल, रविवारी म्हापसा येथे बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आमदार व्हॅजी व्हिएगस, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोव्यात अत्यंत वाईट पद्धतीने राजकारण केले जात आहे. सत्ताधारी आपणाला हवे त्या पद्धतीने गोव्याला लुटत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. संगनमताने गोवा लुटण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये करार झाल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. गेल्या ६० वर्षापासून गोव्यातील अवघ्याच कुटुंबाने येथील राजकारण आपल्या भोवती ठेवले आहे. स्वतःच्या फायद्यासाठी गोव्याला हवे तसे ओरबाडले जात असल्याचेही केजरीवाल म्हणाले. यावेळी आमदार वेन्झी व्हिएगश, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली.
सरकारबद्दलचा रोष जनतेमध्ये दिसून येत आहे आहे. २०२७मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदार आपला मतदानातून आपला रोष व्यक्त करतील, असे अमित पालेकर म्हणाले. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात आवाज उठवला तर गुन्हा दाखल केला जात असल्याचेही पालेकर यांनी सांगितले. आप सरकारने दिल्लीत आमुलाग्र बदल घडवून आणला. त्याची पुर्नरावृत्ती गोव्यात करण्याची गरज आमदार वेन्झी व्हिएगस यांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला मोठा प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
हुकूमशाही राजवट
तब्बल १३ वर्षापासून गोव्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारच्या काळात गोव्यात बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली, खाण व्यवसायाची समस्या कायम आहे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी सारखे प्रश्न गोव्याला सतावू लागले आहेत. पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. डबल इंजिनचा दावा करणाऱ्या सरकारने गोमंतकीयावर हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचे काम केल्याची टीका केजरीवाल यांनी केली.
गुंडाराज थांबविण्याची वेळ आलीय
गोव्यातील मतदारांचा मूड बदलू लागला आहे. पुढील निवडणुकीत सत्ताबदल निश्चित आहेत. या बदलातून आप गोव्यात सक्षम आणि निःस्वार्थी सरकार देईल. भाजपचे गुंडाराज पसरू लागले आहे. तक्रारी दाखल करणाऱ्या सामान्य जनतेला धमकावले जात आहे. शैक्षणिक संस्थामध्ये ड्रग्ज पोहोचला असून यावरून सरकारी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे, हे लक्षात येत असल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांनी सांगितले.