विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:10 IST2026-03-04T12:10:35+5:302026-03-04T12:10:51+5:30
किर्लवाडा-चिंबल येथील सरकारी हायस्कूलमध्ये 'विज्ञान महोत्सव'

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि नवोपक्रमाची जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. आधुनिक विज्ञानासोबत पारंपरिक ज्ञानाचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना शाश्वत भविष्य घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यानी सांगितले. किर्लवाडा-चिंबल येथील सरकारी हायस्कूलमध्ये आयोजित 'विज्ञान महोत्सव' कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आमदार रुदोल्फ फर्नाडिस कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्री शिरोडकर यांनी वैज्ञानिक उपक्रमाचे कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, आत्मविश्वास आणि नवोपक्रमाची संधी देणारे असे उपक्रम आजच्या काळात अत्यंत आवश्यक असून ते गोवा तसेच देशभर राबविले जावेत, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीतमय योग-विज्ञान सादरीकरणाने झाली. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. सरस्वती वंदनेच्या पार्श्वभूमीवर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'विज्ञान मंथन' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बालवाटिका, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्प आणि प्रयोगांचे सादरीकरण केले. विविध शाळांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉलमुळे महोत्सवाला अधिक रंगत आणि विविधता लाभली.
मुख्याध्यापक विशाल गजानन सिगणापूरकर यांच्या नेतृत्वाखाली चिंबल आणि मेरशी परिसरातील शिक्षकवर्गाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. आरोग्य सेवा संचालनालयाचे डॉ. महेश वेर्लेकर यांनी स्वागतपर भाषण केले. सुश्रुत विज्ञान अकादमीचे मनोहर पेडणेकर यांनी आभार मानले. इतर मान्यवरांमध्ये मीनल कौशिक, गौरी कामत, प्रमोद कामत आणि संदेश शिरोडकर यांचा समावेश होता.
१ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
विज्ञान महोत्सवात राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमधून १००० हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'विज्ञान मंथन' या व्यापक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाने बालवाटिका ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शैक्षणिक संस्थांना 'शालेय महापरिवार' या संकल्पनेखाली एकत्र आणण्याचे व्यासपीठ निर्माण केले. या कार्यक्रमाने पुढे "शालेय महासंगम' चे रूप घेतले असून उत्तर गोवा, कुशावती तसेच दक्षिण गोव्यातील विविध शाळांनी त्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे हा कार्यक्रम राज्यव्यापी शैक्षणिक संगम ठरला.