“ही पवित्र भूमी; आई म्हणाली, गोव्यातील मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घे”: सचिन तेंडुलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:19 IST2025-08-23T07:18:41+5:302025-08-23T07:19:11+5:30
क्रिकेटमध्ये अनेक संधी आहेत. संधीचा योग्य फायदा करून घ्यावा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीला 'शॉर्टकट' नसतो. शिस्तीचे पालन करून मार्गक्रमण करा, असे सचिन तेंडुलकरने सांगितले.

“ही पवित्र भूमी; आई म्हणाली, गोव्यातील मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घे”: सचिन तेंडुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण :गोवा ही पवित्र भूमी आहे. मी गोव्यात जाणार, असे आईला सांगितल्यावर आईने गोव्यातील मंदिराना भेट देऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितले, असे मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर याने काल शुक्रवारी सांगितले.
चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयातील 'कला, क्रीडा आंगण' या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात सचिन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. व्यासपीठावर ज्ञान प्रबोधनी मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे अध्यक्ष चेतन मंजू देसाई, शिक्षण संचालक शैलेश सिनाई झिंगडे, नगराध्यक्षा सारा शंभा देसाई, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित देसाई, मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, संस्थेचे अध्यक्ष शांबा नाईक देसाई, संस्थेच्या आम सभेचे अध्यक्ष बाबुसो नाईक गावकर, संस्थेचे पदाधिकारी राम देसाई, आर.बी.एस. कोमरपंत, अजय भगत, अविंद नाईक गावकर आदी उपस्थित होते.
कोणत्याच गोष्टीला 'शॉर्टकट' नसतो
यावेळी सचिन म्हणाला, की क्रिकेटमध्ये अनेक संधी आहेत. संधीचा योग्य फायदा करून घ्यावा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीला 'शॉर्टकट' नसतो. शिस्तीचे पालन करून मार्गक्रमण करा. स्वप्न बघा व ती पूर्ण करून दाखवा. मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची क्षमता बघूनही आनंद झाला.
शिक्षण संचालक झिंगडे यांनी सचिनचा सत्कार केला. इतर मान्यवरांना शंबा देसाई, राम देसाई, ओंकार देसाई, आर. बी. एस. कोमरपंत यांनी स्मृतिचिन्ह भेट दिली. सूत्रसंचालन मनोज नाईक गावकर, दीपा देसाई यांनी केले तर ओंकार देसाई यांनी आभार मानले.
चाहत्यांची मोठी गर्दी
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी विद्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. या इंडोर मैदानात मोक्षद शंभा देसाई या बाल क्रिकेटपटूला बॉलिंग करून सचिनने इनडोअर क्रीडा मैदानाचे उद्घाटन केले.