गोव्यात विधानसभा विसर्जन केल्याची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:18 IST2019-02-18T11:58:02+5:302019-02-18T12:18:09+5:30
गोव्यात विधानसभेचे विसजर्न केले जाईल व मध्यावधी विधानसभा निवडणुका लादल्या जातील अशा प्रकारची अफवा रविवारपासून सर्वत्र पसरली.

गोव्यात विधानसभा विसर्जन केल्याची अफवा
पणजी - गोव्यात विधानसभेचे विसर्जन केले जाईल व मध्यावधी विधानसभा निवडणुका लादल्या जातील अशा प्रकारची अफवा रविवारपासून सर्वत्र पसरली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बोलवल्यामुळे अशी अफवा पसरली पण त्यात अर्थ नाही, असे भाजपामधील विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
पर्रीकर हे आजारी आहेत. ते मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक का बोलावली गेली याची मंत्र्यांनाही पूर्वकल्पना नाही. कारण मंत्र्यांचा बैठकीसमोरील कार्यक्रम रविवारपर्यंत तरी पाठवण्यात आला नाही. ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर भाजपाच्या आमदारांची संख्या 13 झाली आहे. या उलट विरोधी काँग्रेस पक्षाकडे एकूण चौदा आमदार आहेत.
काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाचे तेरापैकी दोन आमदार गंभीर आजारी आहेत. त्यापैकी पांडुरंग मडकईकर हे तर गेल्या विधानसभा अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नाहीत. सत्ताधारी भाजपा आमदारांमध्ये चलबिचल आहे. तसेच काही मंत्रीही अस्वस्थ आहेत. कारण पर्रीकर पूर्वीसारखे सक्रिय नसल्याने कामे होत नाहीत. प्रशासन केवळ नावापुरतेच चालत आहे. सरकार अधूनमधून अस्थिर बनत आहे. मंत्री निलेश काब्राल यांनी खनिज खाण प्रश्नावरून वारंवार भाजपाला घरचा अहेर दिला आहे. केवळ पूल बांधले म्हणून लोकांचे पोट भरत नाही अशा शब्दांत मंत्री काब्राल यांनी नुकतीच आपली नाराजी व्यक्त केली. पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना खाणप्रश्नी तयार केलेला अहवाल म्हणजे राजकीय स्टंट होता असेही मंत्री काब्राल नुकतेच म्हणाले. पर्रीकर यांच्याकडून विधानसभेचे विसर्जन केले जाईल अशी भीती काही मंत्र्यांना वाटते पण त्यात तथ्य नाही.