रितेश नाईक यांना मंत्रिपदासाठी चाचपणी; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:01 IST2026-04-10T07:01:19+5:302026-04-10T07:01:43+5:30
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर गोवा भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून रितेश नाईक यांना मंत्रिपद देण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

रितेश नाईक यांना मंत्रिपदासाठी चाचपणी; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर गोवा भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून रितेश नाईक यांना मंत्रिपद देण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक काल तातडीने दिल्लीत दाखल झाले. अर्थात शेवटी मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरायचीच झाली तर अंतिम निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोलूनच पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
दामू हे दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन चर्चा करतील. गेल्या ऑक्टोबरमध्ये रवी नाईक यांचे आकस्मिक निधन झाल्यापासून सावंत मंत्रिमंडळातील एक मंत्रिपद रिक्तच आहे. फोंडा विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर हे पद भरले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु हायकोर्टाने निवडणूकच रद्द केली.
या एकूण प्रकरणात रितेश यांची 'गेम' झाल्याची भावना एका गटामध्ये आहे. खासकरून भंडारी समाजामध्ये चुकीचा संदेश गेलेला आहे. रितेश यांच्यावर अन्याय झाल्याचे समाजातील काहीजणांना वाटते. २०२७च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपलाही भंडारी समाज दुखावलेला नकोय. त्यासाठी हे प्रयत्न आहेत.
डावलले गेल्याची भावना नको
विशेषतः भंडारी समाजात रितेश यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असून निवडणूक रद्द झाल्यानंतर त्यांना आता डावलले जात असल्याचा संदेश गेल्यास त्याचा राजकीय परिणाम पक्षावर होऊ शकतो, याची जाणीव भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकर तोडगा काढण्यासाठी दामू हे केंद्रीय नेतृत्वाकडून मार्गदर्शन घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
नबीन यांची भेट शक्य
दरम्यान, दिल्लीत भाजपने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असून दामू त्यात भाग घेतील. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही ते भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
म्हणून होत आहे मंत्रिपदासाठी आग्रह
रितेश यांना मंत्रिपद दिल्यास फोंड्यात पुढील निवडणूक भाजपला आणखी सोपी होईल, असे भाजपमधील एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळेच रवी यांचेच पुत्र रितेश यांना मंत्रिपद देण्याचे घाटत आहे. विधानसभा निवडणुकीला नऊ ते दहा महिनेच उरले आहेत. अशा स्थितीत अल्पकाळा रितेश यांना मंत्रिपद दिले तरी मंत्रिपदासाठी अन्य इच्छुक आमदारांची तशी फारशी कुरबूर असणार नाही हे स्थानिक नेते जाणून आहेत.