तिकीट तपासणीतून २७.५९ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेचे प्रगती, सुरक्षा आणि प्रवासी सेवेचे नवे पर्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:46 IST2026-04-04T10:45:34+5:302026-04-04T10:46:15+5:30
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सरत्या आर्थिक वर्षात संपर्क, सुरक्षा आणि सेवा या तिन्ही आघाड्यांवर ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत.

तिकीट तपासणीतून २७.५९ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेचे प्रगती, सुरक्षा आणि प्रवासी सेवेचे नवे पर्व
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव:कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सरत्या आर्थिक वर्षात संपर्क, सुरक्षा आणि सेवा या तिन्ही आघाड्यांवर ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. 'विकसित भारत' आणि 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेला बळकटी देत, कोकण रेल्वेने केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर प्रवासी अनुभवातही आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
या वर्षाचे सर्वात मोठे यश म्हणजे तिकीट तपासणीतून मिळालेला २७.५९ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल. याशिवाय, मालवाहतुकीत 'रो-रो' सेवेची क्षमता ५० मेट्रिक टनावरून ५७ मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारली आहे. रेल्वेने भाविकांसाठी रंजणगाव, अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणारी 'देव दर्शन' विशेष ट्रेनही चालवली.
अभियांत्रिकी क्षेत्रात, यूएसबीआरएल प्रकल्पाचे काम पूर्ण करणे हा एक महत्त्वात्चा टप्पा ठरला. सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे ट्रॅक मॉनिटरिंगसारख्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी पार पाडताना रेल्वेने ३.६७ लाख किलोवॅट-तास सौर ऊर्जा निर्माण केली, ज्यामुळे सुमारे ४५.९४ लाख रुपयांची बचत झाली.
कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १,४०० 3 विशेष गाड्या सोडल्या, ज्यात गणपती उत्सवासाठी ३७६ गाड्यांचा समावेश होता. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, खेड आणि मडगाव यांसारख्या १० महत्त्वाच्या स्थानकांवर अत्याधुनिक एसी लाउंज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प आणि ब्रेल चिन्हांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच, सुरक्षित प्रवास आणि उत्कृष्ट सेवा या जोरावर कोकण रेल्वेने या वर्षात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
९० बेपत्ता मुलांचा शोध
रेल्वे सुरक्षा दलाने २२ चोरीच्या प्रकरणांचा छडा लावत ३५.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे, रेल्वेने २० बेपत्ता मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले. जनावरांचे अपघात रोखण्यासाठी रत्नागिरी आणि कारवार भागात २,७०० मीटरचे कुंपण घालण्यात आले आहे.