ग्रामसभेत प्रश्न विचारताना हृदयविकाराचा धक्का; सांताक्रूझमध्ये निवृत्त कृषी उपसंचालकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:42 IST2026-02-09T11:42:18+5:302026-02-09T11:42:18+5:30
घर हस्तांतरण शुल्कावरून गदारोळ, यानंतर ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.

ग्रामसभेत प्रश्न विचारताना हृदयविकाराचा धक्का; सांताक्रूझमध्ये निवृत्त कृषी उपसंचालकांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांताक्रूझ पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत वाढीव घरपट्टीच्या विषयावरून मोठा गदारोळ झाला. घर हस्तांतरण शुल्क २५ हजार रुपये केल्याच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. यावेळी तेथे प्रश्न उपस्थित करणारे ७० वर्षीय निवृत्त कृषी उपसंचालक ओलावियो फर्नाडिस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांना तातडीने गोमेकॉत नेले असता मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यानंतर ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.
सांताक्रूझ पंचायतीने घर हस्तांतरण करण्यासाठीचे शुल्क २५ हजार रुपये केल्याच्या विषयावरून ग्रामसभा बरीच तापली. शेजारील अन्य पंचायतींमध्ये हे घर हस्तांतरण शुल्क कमी आहे. घरपट्टीही कमी आहे. त्यामुळे कर कमी करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आपल्याच पंचायतीने करवाढ का केली?
असा सवाल करत ग्रामस्थांनी सरपंच जेनिफर ओलिव्हेरा यांना धारेवर धरले. त्यामुळे वातावरण तापले होते. सरपंच जेनिफर यांनी घर हस्तांतरण शुल्क या पंचायत मंडळाने वाढविल्याचा आरोप फेटाळला.
सरपंचांनी सांगितले की, घर हस्तांतरण शुल्क २५ हजार रुपये करण्याचा निर्णय आमच्या पंचायत मंडळाने घेतला नव्हता. हा निर्णय मागील मंडळाने घेतला होता. आता ग्रामस्थ सांगतात म्हणून आम्ही हा निर्णय मागे घेऊ शकत नाही. मात्र, सरपंचांच्या उत्तराने ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावारण होते. यादरम्यान, फर्नांडिस हे बोलायला उभे राहिले. मात्र त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यांना तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले.
लोकांना हवे तेच पंचायतीने करावे : आमदार फर्नांडिस
घर हस्तांतरणासाठी २५,००० रुपये कर ही रक्कम अधिक वाटते. आजूबाजूच्या अन्य पंचायतींमध्ये हा कर १० हजार रुपयांपर्यंत आहे. हा विषय मी पंचायतमंत्र्यांकडे मांडला आहे. लोकांना ही रक्कम जास्त वाटते तर पंचायतीने कमी करावी, असे मत आमदार रुदोल्फ फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
पंचायत घर रखडले : परेरा
दरम्यान, ग्रामसभेत विरोधी गटाचे पंच डॉम्निक इनासिओ परेरा म्हणाले, पंचायतघराचे बांधकाम अजूनही रखडलेले आहे. पंचायतीकडून केवळ बजेटमध्ये निधीची तरतूद केली जाते. सध्याचे पंचायत मंडळ हा विषय पुढे नेऊ पाहत नाही. केवळ कारणे देत आहेत असा सवाल त्यांनी केला. सर्वच प्रश्नांबाबत चालढलक सुरू आहे.
रुग्णवाहिका आलीच नाही
ओलावियो फर्नाडिस हे उभे राहून प्रश्न विचारत होते. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. उपस्थितांनी त्वरित १०८ रुग्णवाहिकेला बोलावले. स्थानिकांनी फर्नाडिस यांना कारमधून गोमेकॉत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले.
निवृत्त कृषी उपसंचालक
ग्रामसभेत हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेले ओलावियो फर्नाडिस हे कृषी खात्याचे उपसंचालक होते. २०१३-२०१४ या काळात त्यांनी या पदावर काम केले होते. सेवा निवृतीनंतर ते गावातील विविध प्रश्नांविषयी सक्रीय होते. ते नेहमी ग्रामसभेला उपस्थित राहून विविध विषय हाताळत असत असे ग्रामस्थांनी सांगितले.