जनरेटर, इन्व्हर्टरची नोंदणी करा, अन्यथा कठोर कारवाई करू; वीजमंत्री ढवळीकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 07:40 IST2025-09-02T07:38:01+5:302025-09-02T07:40:47+5:30
दुर्घटना टाळण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजनांची माहिती.

जनरेटर, इन्व्हर्टरची नोंदणी करा, अन्यथा कठोर कारवाई करू; वीजमंत्री ढवळीकर यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : जनरेटर व मोठ्या इन्व्हर्टरमुळे तांत्रिक कारणांनी काही निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. भविष्यात त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून खात्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या लोकांकडे मोठे इन्व्हर्टर व जनरेटर आहेत, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर परवानगी घ्यावी. नवीन लोकांनी पूर्वपरवानगी घ्यावी. अन्यथा काही दिवसांत कारवाई सुरू करू, असा इशारा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.
क्रांती मैदान येथील सदर गणेशोत्सव मंडळाला मंत्री ढवळीकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ढवळीकर म्हणाले की, इन्व्हर्टरमुळे वीजप्रवाहात धोकादायक बदल घडून येतात. त्यामुळे परिसरातील घरांमध्ये असलेल्या वीज प्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर इतर काही गंभीर दुष्परिणाम जाणवतात.
वीज खात्याचे कर्मचारी ज्यावेळी परिसरात काम करत असतात, तेव्हा अशा रिव्हर्स वीजप्रवाहामुळे त्यांच्या जिवावर बेतू शकते. यासंबंधी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यापुढे कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. जॉइंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली या सगळ्या गोष्टी करण्यात येतील.
कोणाचीही गय करणार नाही
केपे येथे दोघा भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यासंदर्भात ते म्हणाले की, 'झालेली घटना दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेणार आहोत. चुकीच्या पद्धतीने वीज वापरणाऱ्या लोकांवर यापुढे अंकुश ठेवला जाईल. वीज खात्याला अंधारात ठेवून संबंधित कामे करणाऱ्या लोकांची यापुढे गय केली जाणार नाही.
अडगळीच्या ठिकाणचे मीटर बदला
मंत्री ढवळीकर म्हणाले की, ज्या लोकांनी विजेचे मीटर अडगळीच्या ठिकाणी लावलेले आहेत, त्यांनी ते सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्यासंबंधीसुद्धा नियम करण्यात आले आहेत. नागरिकांनी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आपल्या मीटरच्या जागेत बदल करावा. लोकांनी सहकार्य केल्यास हे काम लगेच पूर्ण होईल. या प्रश्नाबाबतही लोकांना आम्ही कसलीच मुभा देणार नाही. गरज पडल्यास काही कालावधी वाढवून देऊ. मात्र, नियमात बदल केला जाणार नाही. यासंबंधी वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही मंत्री ढवळीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.