भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:59 IST2025-09-27T12:59:07+5:302025-09-27T12:59:55+5:30
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक उपस्थित होते.

भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आम्हाला राज्यात भाजपला पराभूत करायचे आहे. त्यासाठी आम्ही कोणाशीही युती करण्यास तयार आहोत. यासाठी आम्हाला निवडणुकीच्या वेळी नको तर आताच युती हवी आहे. जर कुणाला रस असल्यास दि. २ ऑक्टोबर रोजी युती करुन राज्यात भाजपचा पराभव मोहीम सुरू करूया, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक उपस्थित होते.
अॅड. पालेकर म्हणाले की, युती ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करायची की नाही हे आता निश्चित नाही, पण अन्याय विरोधात, गुंडाराज विरोधात युती करण्यास तयार आहोत. राज्यात गुंडगिरी वाढली असून गेल्या काही महिन्यांमध्ये आम आदमी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना धमकविण्यात येत रामा आहे. काणकोणकर यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला झाला. आता सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकी दिल्याचे समोर आले. याला सरकारच जबाबदार आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी अभियान सुरू करत आहोत, असेही ते म्हणाले.
भाजपला सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या विरोधात जो कुणी आवाज उठवीत आहे, त्यांना धमकविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. हे आताच कुठेतरी थांबविले पाहिजे. यासाठी ही मोहीम असणार आहे. आमचे नेते, कार्यकर्ते राज्यभर फिरून ही मोहीम यशस्वी करण्यावर भर देणार आहेत, असेही अॅड. पालेकर यांनी सांगितले.