तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे रवींचे स्वप्न साकार: ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:18 IST2026-01-01T08:17:52+5:302026-01-01T08:18:37+5:30
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय : आता विकासकामांना मिळणार चालना

तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे रवींचे स्वप्न साकार: ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्य सरकारने तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा करून दिवंगत नेते रवी नाईक यांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे (मगो) अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या मगो पक्षाने या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून, या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ढवळीकर म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी तिसऱ्या जिल्ह्याची आवश्यकता होती. रवी नाईक यांनी याबाबत अनेक वर्षांपूर्वी मांडलेली संकल्पना आज प्रत्यक्षात येत आहे, ही समाधानाची बाब आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, तिसरा जिल्हा झाल्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल, नागरिकांना सेवासुविधा लवकर मिळतील आणि दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होईल. सरकारचा हा निर्णय दूरदृष्टीचा असून, मगो पक्ष सरकारसोबत राहून या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करेल, असेही दीपक ढवळीकर यांनी सांगितले.
कवळेकरांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार
नवीन जिल्ह्याची स्थापना करून या जिल्ह्याला कुशावती असे समर्पक नाव दिल्याबद्दल तसेच केपे शहराला या जिल्ह्याचे मुख्यालय करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केपेवासायांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.
कुशावतीच्या निर्मितीबद्दल एल्टनही समाधानी
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी केपे येथे मुख्यालय असलेल्या "कुशावती" जिल्ह्याच्या निर्मितीबद्दल केपे मतदारसंघातील नागरिकांसह सांगे, काणकोण व धारबांदोडा तालुक्यातील सर्व जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे दक्षिण गोव्याच्या या भागाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन विकासकामांना गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. या संधीचा योग्य उपयोग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या हितासाठी व्हावा, असेही एल्टन म्हणाले.
काणकोणचा समावेश नको : गोवा फॉरवर्ड
राज्यात प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्यात (कुशावती) काणकोणचा समावेश करण्यास गोवा फॉरवर्ड पक्षाने विरोध दर्शविला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी बुधवारी भूमिका स्पष्ट केली. नाईक म्हणाले की, काणकोणवासीयांना तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र, काणकोण तालुका दक्षिण गोव्यातच राहावा, अशी ठाम भूमिका आहे. काणकोणचा समावेश नव्या जिल्ह्यात केल्यास भौगोलिक, प्रशासकीय व सामाजिक अडचणी निर्माण होतील. मुख्यालय केपे कुडचडे केले, तर लोकांना बसची सोय नाही.