रमेश तवडकर यांना प्रियोळमध्ये इंटरेस्ट! गोविंद गावडेंच्या मतदारसंघात भेटीगाठीने कुरघोडीच्या चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:22 IST2025-04-01T12:21:06+5:302025-04-01T12:22:18+5:30
दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

रमेश तवडकर यांना प्रियोळमध्ये इंटरेस्ट! गोविंद गावडेंच्या मतदारसंघात भेटीगाठीने कुरघोडीच्या चर्चेला उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सभापती रमेश तवडकर यांच्या रविवारी भोम येथील एका कार्यक्रमातील उपस्थितीने प्रियोळ मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे. तवडकर यांना प्रियोळ मतदारसंघात नेमके बोलवतो कोण, याची उत्सुकता लागली असतानाच कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढू लागलेली आहे. एकाच पक्षात राहून तवडकर हे कुरघोडीचे राजकारण करत असल्याची चर्चा गावडे यांच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. भाजपने हे द्वंद्व वेळीच न थोपविल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत येथे वेगळेच चित्र निर्माण होऊ शकते.
आदिवासी संघटनेच्या वर्चस्वातून तयार झालेले हे दोन्ही नेते आज वेगवेगळ्या चुली मांडून आहेत. तवडकर हे संघाच्या मुशीतून तयार झाले आहेत. आदिवासी समाजातही या दोघांचे वेगवेगळे समर्थक आहेत.
पक्षाला दोघांमधील द्वंद्व दिसत नाही
तवडकर यांच्या व्यासपीठावर गावडे सहसा दिसत नाहीत, त्याचबरोबर गावडे यांच्या कार्यक्रमाला सभापतींना स्थान दिले जात नाही, अशी परिस्थिती आहे. आता हे दोघेही आणखी कुठल्या पक्षात असते तर गोष्ट वेगळी होती.
मात्र, जो पक्ष स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणून बिरुद लावतो त्या पक्षाला या दोघांमधील द्वंद्व दिसत नाही का, की सर्व काही माहीत असूनही नेते मजा घेत आहेत, असे प्रश्न या दोघांच्या कार्यकर्त्यांना पडले आहेत.
स्थानिक आमदाराला डावलेले
रविवारी भोम येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा वादन स्पर्धा झाली. उद्योजक सुनील भोमकर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला. या कार्यक्रमाला आयोजकांनी चक्क रमेश तवडकर यांना बोलावले. कार्यक्रम प्रियोळ मतदारसंघात साजरा होत असताना गोविंद गावडे यांना डावलून चक्क काणकोणमधील तवडकरांना येथे का बोलावले, हा प्रश्न निर्माण होत आहे. तेथील मगोचे प्रभावी नेते दीपक ढवळीकर यांचीसुद्धा तवडकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती असते.
तवडकर समर्थक वाढू लागले
आपल्याला आवर्जून आमंत्रण असते. त्यामुळे कार्यक्रमाला जातो असे ढवळीकर सांगतात. नेमके हेच गोविंद गावडे यांच्या कार्यकर्त्यांना पचनी पडत नाही. त्यातूनच दरी वाढत चाललेली आहे. रमेश तवडकर यांना मानणारा एक गट आता प्रियोळमध्ये तयार झालेला आहे. काही छुप्या पद्धतीने त्यांना पाठिंबा देऊ लागले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते तवडकर यांना बोलावत आहेत. यावरून निदान भाजपमध्ये तरी सर्व क्षेमकुशल आहे, असे सांगता येणार नाही.
मतदारसंघ आरक्षित होणार?
प्रियोळ मतदारसंघ हा आदिवासी समाजासाठी आरक्षित होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच तर तवडकर तेथे सक्रिय झाले नसावेत ना, गोविंद गावडे व तवडकर यांच्यात चाललेला कलगीतुरा सोसणाऱ्या भाजपने येथे एक त्रयस्त व्यक्ती तर उमेदवार म्हणून अगोदरच हेरून ठेवली नसेल ना, अशा शंकाही निर्माण होऊ लागल्या आहेत.
जाहीर कार्यक्रमांमधूनही टीका टिप्पणी
जाहीर व्यासपीठावरून दोघेही एकमेकांवर शिंतोडे उडवतात. काही ठिकाणी नाव घेतले जात नाही. मात्र, रोख कुणावर आहे हे सहज लक्षात येते. काही वेळा तर चक्क मुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाही दोघेही एकामेकांवर शाब्दिक प्रहार करतात आणि भाजप पक्ष हे सर्व खपवून घेतो. म्हणूनच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. गोरगरिबांना घरे बांधण्याचा जो कार्यक्रम रमेश तवडकर यांनी सुरू केला आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रियोळ येथे एन्ट्री घेतली. नंतर त्यांचे तेथे अनेक कार्यक्रम नित्यनेमाने होत राहिलेले आहेत. हे कार्यक्रम राबवत असताना ते कधीच गोविंद गावडे यांना विश्वासात घेत नाहीत.