रामा काणकोणकर यांचा जबाब नोंदवला; तपासाला गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:35 IST2025-10-04T12:34:20+5:302025-10-04T12:35:06+5:30
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी गोमेकॉत येथे जाऊन उपचार घेत असलेल्या रामा यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

रामा काणकोणकर यांचा जबाब नोंदवला; तपासाला गती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : करंजाळे येथे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांचा शुक्रवारी पणजी पोलिसांनी गोमेकॉत जबाब नोंदवला. पोलिसांनी हल्ल्याच्या दिवशीचा घटनाक्रम रामा यांच्याकडून जाणून घेतला. यावेळी रामा यांनी 'मिंगेल आरावजो हा आपल्या पाळतीवर होता,' असे सांगितले. या जबाबाची पोलिस आता पडताळणी करीत आहेत.
जबाब नोंद झाल्याने हल्ला प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १७ सप्टेंबर रोजी करंजाळे येथे हल्ला झाला. त्यानंतर, रामा यांच्यावर गेले पंधरा सोळा दिवसांपासून गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
विश्वजीत यांनी केली रामाची विचारपूस
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी गोमेकॉत येथे जाऊन उपचार घेत असलेल्या रामा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'सरकार काणकोणकर यांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार देत आहे. याविषयी देखरेखीसाठी डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. रामा यांच्या डिस्चार्जबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत त्यांची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबाची खात्री पटत नाही, तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.
रामा यांनी काय सांगितले?
संशयित मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करायचा. ज्यावेळी संशयितांनी आपल्याला गाठून मारहाण केली. त्यांनी आपल्याला जातीवाचक उल्लेख करून, शिवीगाळ केल्याचे जबाबात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत काणकोणकर यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. जोपर्यंत त्यांची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबाची खात्री पटत नाही, तोपर्यंत डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे राणे यांनी सांगितले.
मास्टरमाइंडचा शोध
काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी पणजी पोलिसांनी सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोज याच्यासह सात जणांना अटक केली आहे. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, अजूनही या हल्ल्यामागील मास्टरमाइंड कोण याचा उलगडा झाला नसल्याचे सामाजिक आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे
गेल्या काही दिवसांपासून त्यांचा जबाब घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे जबाब नोंदवणे शक्य झाले नव्हते. अखेर हल्ल्यानंतर जवळपास १५ दिवसांनंतर, शुक्रवारी, त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी कोणावर कारवाई केली जाईल, याकडे लक्ष लागले आहे. हल्ल्यामागील कारणांचा उलगडा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.