राहुल गांधी आज गोव्यात, आमदारकीच्या निवडणुकींचा रणसंग्राम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:14 IST2022-02-04T08:11:49+5:302022-02-04T08:14:42+5:30
सोनिया, प्रियांका गांधीही लवकरच येणार

राहुल गांधी आज गोव्यात, आमदारकीच्या निवडणुकींचा रणसंग्राम
पणजी : काँग्रेसचे स्टार प्रचारकही उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. शुक्रवारी ४ रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधीगोवा दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी याही येत्या काही दिवसांत गोव्यात येणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, सिद्धरामय्या, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सचिन पायलट, पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, माजी मंत्री शशी थरूर, अमित देशमुख, नाना पटोले, कन्हैया कुमार, बी. व्ही. श्रीनिवास प्रचारासाठी येणार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी आता रंगात आल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान आले आहे. सर्वपक्षीयांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोवा निवडणुकीतील थेट लढत आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षात असल्याचा मोठा दावा केला आहे. केजरीवाल यांनी काँग्रेस नेतृत्वाला झिडकारले आहे, त्यामुळे आजच्या राहुल गांधीच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.