विरोधी पक्षांच्या युतीबाबत प्रश्नचिन्ह; RG प्रमुख मनोज परब, वीरेश बोरकर गोव्याबाहेर गेल्याने चर्चेला ऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:16 IST2025-11-24T12:15:54+5:302025-11-24T12:16:41+5:30
आरजीचे प्रमुख मनोज परब व आमदार वीरेश बोरकर एकत्र विमानातून गोव्याबाहेर गेले असून ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षांच्या युतीबाबत प्रश्नचिन्ह; RG प्रमुख मनोज परब, वीरेश बोरकर गोव्याबाहेर गेल्याने चर्चेला ऊत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजीची युती खरोखरच होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आरजीचे प्रमुख मनोज परब व आमदार वीरेश बोरकर एकत्र विमानातून गोव्याबाहेर गेले असून ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.
मनोज परब यांनी स्वतःच विमानातील फोटो सोशल मीडियावर टाकून 'किर्दे ते उजो, स्टे ट्युन्ड' अशी पोस्टही सोबत टाकल्याने चर्चेला ऊत आला आहे. जि. पं. निवडणुकीसाठी काहीतरी महत्त्वाच्या घडामोडी चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. दोघांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने काल रात्री उशिरापर्यंत केला. परंतु दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार असली तरी विरोधकांच्या युतीला मुहूर्त मिळालेला नाही.
मनोज परब यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन फुटिरांना प्रवेश देणाऱ्यांशी आम्ही संबंध कसे जोडायचे? असा प्रश्न केला. शनिवारी युरी आलेमाव यांनीही याची री ओढत गोवा फॉरवर्डच्या कृतीवर असंतोष व्यक्त केला. यामुळे युती फिस्कटते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तिन्ही विरोधी पक्ष जि. पं. निवडणुकीसाठी एकत्र असल्याचे चित्र उभे केले जात होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला फातोर्डा येथील कार्यक्रमात काँग्रेसचे युरी आलेमांव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार सरदेसाई व आरजीचे मनोज परब एकत्र आले. नंतर कुंकळ्ळीत युरींच्या वा त्यानंतर कुंकळ्ळी येथे युरींच्या वाढदिनीही सर्वांनी हातात हात धरुन एकत्र असल्याचे संकेत दिले. परंतु गोवा फॉरवर्डने माजी उपसभापती इजिदोर फर्नाडिस यांना पक्षात प्रवेश दिल्याने आरजी व काँग्रेस नाराज झाला.
बैठकीला मुहूर्त मिळेना
शनिवारी तिन्ही पक्षांची बैठक होणार होती परंतु ती काही झाली नाही. आरजीच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्यावरच भर दिला. गोवा फॉरवर्डचे उमेदवारही प्रचार करू लागले आहेत.
सरदेसाईही प्रचारात व्यस्त
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून बैठकीसाठी फोन आला होता, यास सरदेसाई यांनी दुजोरा दिला. आपण प्रचारात व्यस्त असल्याचे ते म्हणाले. गोवा फॉरवर्डने मयें, धारगळ, कुंभारजुवें भागात सभाही घेतल्या. सरदेसाई यांनी स्वतः जुने गोर्वेतील सभेला उपस्थिती लावली होती.
एकत्र बसून सोक्षमोक्ष लावणार
'लोकमत'ने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'मी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना फोन करुन एकत्र बसून युतीसंबंधी काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले आहे. गोव्यातील जनतेला विरोधी पक्षांमध्ये युती झालेली हवीय. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सर्व मुद्यांवर चर्चा करायला हवी. जागावाटप वगैरे ठरायला हवे. जो पक्ष ज्या मतदारसंघामध्ये मजबूत आहे, तेथे त्याला ती जागा मिळायला हवी. या सर्व गोष्टींवर एकमत झाल्यानंतरच युतीवर शिक्कामोर्तब होईल.'
काँग्रेस अजून आपले उमेदवार जाहीर करायचा आहे. परंतु आरजी व फॉरवर्डच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केल्याबद्दल विचारले असता पाटकर म्हणाले की, 'जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचेही उमेदवार तयार आहेत. गट स्तरावरुन जिल्हा स्तरावर नावे गेलेली असून या नावांवर चर्चाही झालेली आहे. काँग्रेस ज्या मतदारसंघांमध्ये प्रभावी आहे तेथे आम्ही इतरांना जागा देऊन कसे चालेल?'
आमदार विजय सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना इजिदोर यांना गोवा फॉरवर्डमध्ये दिलेला प्रवेश हा केवळ फॉरवर्डचे पैंगीणचे उमेदवार प्रशांत नाईक यांना अधिकाधिक मतें मिळावित यासाठी आहे असे सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत इजिदोर यांनी या ठिकाणी ६ हजार मतें प्राप्त केली होती. ती प्रशांत यांना मिळावीत हाच हेतू आहे,' असे ते म्हणाले.