लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : आपल्यामध्ये जर कोणते मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष अधिकाधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे २७उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले असून ते साध्य करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच एकत्र राहून काम करायला पाहिजे असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.
चिखली पंचायत सभागृहात शनिवारी रात्री दाबोळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाईक यांनी दक्षिण गोव्यातील पहिला कार्यकर्ता मेळावा दाबोळी मतदारसंघात घेतला होता. प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्याबरोबर खासदार सदानंद शेट तानावडे, व्यासपीठावर पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप मंडळाचे अध्यक्ष सचिन चौगुले, प्रभारी जयंत जाधव, जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोराट, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, मुरगावचे नगरसेवक विनोद किनळेकर आदी उपस्थित होते.
विरोधकांनी अनेक षडयंत्रे रचली : माविन गुदिन्हो
मंत्री गुदिन्हो म्हणाले, की मला जे काही यश मिळाले, ते दाबोळी मतदारसंघातील मतदारांच्या पाठिंब्यामुळेच. विरोधकांनी माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचली. नाव बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात अफवा पसरविण्यात आल्या. मात्र मी शांत राहिलो. विरोधकांनी रचलेल्या या षडयंत्राची जाणीव झाल्यानंतर लोकांनीच मला पाठिंबा दिला. क्रोधित होऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर विरोधकांना त्याचा फायदा झाला असता
मंत्री गुदिन्हो म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत मला त्रास व्हावा यासाठी दाबोळीतील उड्डाणपुलाचे काम बंद झाल्याची अफवा काही विरोधकांनी पसरवण्यास सुरुवात केली होती. त्या उड्डाणपुलाचे काम जोरात चालू आहे. मला त्रास व्हावा यासाठी त्या उड्डाणपुलाचे काम बंद पडावे, असे विरोधकांना वाटते. पण उड्डाणपुलाचे काम बंद झाल्यास जनतेला त्याचा त्रास होणार आहे. याची त्या विरोधकांना मुळीच काळजी नाही.
२७ आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले, की २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या २७उमेदवारांना विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून आतापासूनच कामाला सुरुवात केल्यास हे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल. राज्यात आणि देशात भाजपला शक्तिशाली बनवण्यात ज्या थोर नेत्यांचा हात आहे, त्यांची आठवण आम्ही सदैव ठेवणे गरजेचे आहे.