युवा महोत्सवातून कर्तृत्व सिद्ध करा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:01 IST2026-01-05T13:00:27+5:302026-01-05T13:01:37+5:30
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी टीमला दिल्या शुभेच्छा, टीम दिल्लीला रवाना

युवा महोत्सवातून कर्तृत्व सिद्ध करा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यातील युवा शक्तीत वेगवेगळ्या प्रतिभा ठासून भरलेल्या आहेत. कला, क्रीडा, संगीत व इतर क्षेत्रात युवकांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतलेली आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी गोव्याच्या टीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय क्रीडामंत्र्यांसोबत आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपले कौशल्य दाखवून नावलौकिक मिळवावे, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युवा टीमला शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय युवा महोत्सव हा देशपातळीवर युवकांना व त्यांच्या कौशल्य, क्रीडा, संगीत व इतर चौफेर क्षेत्रात स्पर्धा करण्याची संधी मिळत असल्याने गोमंत युवकांसाठी ही पर्वणी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्याची टीम राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नवी दिल्लीला रवाना होत असून, डॉ प्रमोद सावंत यांनी रवींद्र भवनात या टीमला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीही गोव्याच्या टीमने राष्ट्रीय युवा महोत्सवात आपली चमक दाखवताना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेली असून, यावेळीही वेगवेगळ्या क्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट व इतर उपस्थित होते.