रितेश नाईकला तिकीट देण्यासाठी दबाव; मुख्यमंत्री दिल्लीला, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:04 IST2025-10-17T09:02:52+5:302025-10-17T09:04:09+5:30
भंडारी समाजाच्या नेत्यांची एकमुखी मागणी

रितेश नाईकला तिकीट देण्यासाठी दबाव; मुख्यमंत्री दिल्लीला, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत रवींचे ज्येष्ठ पुत्र रितेश यांना वारसदार म्हणून उमेदवारी देण्यासाठी भाजपवर दबाव येऊ लागला आहे. भंडारी समाजाच्या नेत्यांनी या मागणीसाठी जोर धरला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल दिल्लीत दाखल झाले असून केंद्रीय नेत्यांशी ते उमेदवारीबाबत तसेच मंत्रिमंडळात रिक्त झालेल्या जागेबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे.
रितेश हे सध्या फोंडा नगरपालिकेत नगरसेवक आहेत. रवींच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या सहा महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे रितेश यांनाच उमेदवारी दिली जावी, असे भंडारी समाजाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रवींच्या निधनानंतर खांडेपारला लोटलेला अफाट जनसागर पाहता सहानुभूतीच्या लाटेचा फायदा रवींच्या दोनपैकी एखाद्या पुत्राला तिकीट दिल्यास भाजपला होऊ शकतो, असे पक्षातील एका गटाचे स्पष्ट मत आहे. रवी हे बहुजन समाजात प्रिय होते. त्यामुळे भाजप त्यांच्या वारसदाराचीच उमेदवारीसाठी निवड करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारी समाजाचे नेते तथा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना पत्र लिहून रितेश यांनाच आगामी पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. पत्रात त्यांनी माथानी साल्ढाना यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी एलिना यांना भाजपने तिकीट दिले व दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी कुठ्ठाळीच्या पोटनिवडणुकीत त्यांना बिनविरोध निवडून आणले याकडे लक्ष वेधले. रितेश यांना फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन अशाच प्रकारे बिनविरोध निवडून आणावे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला रवाना
पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल, गुरुवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. आज, शुक्रवारी ते दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. त्यानंतर तेथूनच ते बिहारला जाणार आहेत. बिहारमध्ये मुख्यमंत्री सावंत हे दोन दिवस असतील. तेथील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये ते सहभागी होतील.
तिकीटही द्यावे, मंत्रीही करावे : देवानंद नाईक
अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक म्हणाले की, 'भाजपने रितेश यांना पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे व ते निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळातही त्यांना स्थान द्यावे, जेणेकरून ते आपल्या वडिलांचा वारसा चालवू शकतील.'
रवींचे समर्थक पाठीशी : संजीव नाईक
समाजाचे अन्य एक नेते संजीव नाईक म्हणाले की,' या कठीण काळात भंडारी समाज पूर्णपणे रवींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. भाजपने रखींच्या दोनपैकी एका पुत्राला पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे. रवींचे समर्थक त्यांच्या पाठीशी कायम राहतील.'
फोंड्याबाबत आम्ही युतीचा धर्म पाळू : मंत्री सुदिन ढवळीकर
फोंडा विधानसभा मतदारसंघाबाबत आमचा मगो पक्ष युतीच्या धर्माचे पालन करील. भाजपकडूनही तशीच अपेक्षा आहे. शेवटी फोंड्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी तिकीट कुणाला द्यावे व काय निर्णय घ्यावा, ते भाजपचे स्थानिक व केंद्रीय नेते मिळून ठरवतील, असे वीजमंत्री व मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
'लोकमत'ने ढवळीकर यांना फोंड्याविषयी भूमिका विचारली, त्यावेळी सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'मगो पक्षाची भूमिका पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मांडलेली आहे. मी त्याच भूमिकेला दुजोरा देतो. मगोपची कार्यकारिणी चर्चा करून याबाबत शिक्कामोर्तब करील. मात्र, मगो पक्ष हा युतीचा धर्म कायम पाळत आला आहे. फोंडा मतदारसंघाबाबतही आम्ही हा धर्म पाळू, भाजपचे केंद्रीय नेतृत्व व गोव्यातील भाजप नेतृत्व काय ते ठरवील, आमचे त्यांना पूर्ण सहकार्य असेल.'
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाविषयी आपल्याला अतिव दुःख झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, राजकारणात मतभेद हे असतातच. पण रवी नाईक हे आदरणीय नेते होते, त्यांचे योगदान आम्ही विसरू शकत नाही. त्यांचे स्मरण आम्हाला कायम राहील. दरम्यान, रितेश यांना सर्वांनी बिनविरोध निवडून आणावे असे दीपक ढवळीकर यांनी कालच सुचविले आहे.