सरकारला अधिवेशनात धारेवर धरण्याची तयारी; रणनीतीसाठी विरोधी आमदारांची उद्या बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:06 IST2026-01-05T13:05:06+5:302026-01-05T13:06:06+5:30
पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, लोक या सरकारला कंटाळले आहेत.

सरकारला अधिवेशनात धारेवर धरण्याची तयारी; रणनीतीसाठी विरोधी आमदारांची उद्या बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या १२ रोजीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत रणनीती ठरविण्यासाठी विरोधी आमदारांची बैठक उद्या, मंगळवारी (दि. ६) बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमात यांनी ही माहिती दिली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे गोव्याबाहेर होते. त्यामुळे बैठक पुढे ढकलावी लागली होती. ती उद्या, मंगळवारी होईल, असे युरी यांनी सांगितले.
याबाबत आलेमाव म्हणाले की, पर्यावरण हानी, बेरोजगारी, वाढते गुन्हे, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवरून या अधिवेशनात आम्ही सरकारला घेरणार आहोत. ज्या पद्धतीने दादागिरी व हुकूमशाही चालवली आहे, त्याचा जाब सरकारला विचारला जाईल. सरकारकडे कोणतेही धोरण नाही. आश्वासने दिली जातात, परंतु ती पाळली जात नाहीत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण असून, पुन्हा राज्याचे गुलाबी चित्र निर्माण केले जाते. सरकारच्या गैरकारभाराबद्दल विरोधक सामूहिकपणे जाब विचारतील.
युरी म्हणाले की, गोव्यात नाईट क्लबमधील दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. अमली पदार्थ व्यवहार वाढलेले आहेत. रस्ता अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, लोक या सरकारला कंटाळले आहेत.
वीरेश बोरकर सहभागी होणार
दरम्यान, आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, उद्या, ६ रोजी सभापतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली असून, त्यानंतर युरी यांनी विरोधी आमदारांची बैठक बोलावली आहे. माझ्याशी त्यांनी संपर्क साधला असून, मी बैठकीला उपस्थित राहणार आहे.
लोकांच्या प्रश्नांवर विरोधी आमदारांनी संयुक्तपणे आवाज उठवावा, ही आमचीही भूमिका आहे अधिवेशनाला आता जेमतेम सात ते आठ दिवस राहिले असून, विरोधकांनी काही प्रश्नांवर संयुक्तपणे लक्षवेधी सूचना सादर केल्यास सभापतींकडून त्या कामकाजात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन अल्पकालीन असल्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातूनही विरोधी आमदारांना आवाज उठवावा लागेल.
युती दिसणार का?
दरम्यान, अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ काँग्रेस व गोवा फॉरवर्ड एकत्र राहिले होते, तर आरजी व आपने वेगळी चूल मांडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभेत खरोखरच विरोधकांची युती दिसणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.