सात वर्षे म्हणजे साधारणतः अडीच हजार दिवस प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रिपदी आहेत. राज्याची सूत्रे गेली सलग सात वर्षे ते सांभाळत आहेत. अनेक प्रकारचे वाद, जनआंदोलने, मंत्र्यांमधील स्पर्धा, कसोटीचे प्रसंग असे सर्व काही गेल्या सात वर्षांत प्रमोद सावंत यांनी अनुभवले. साखळीच्या श्री दत्ताचा व हरवळेच्या श्री रुद्रेश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळाला. शिवाय पणजीतील महालक्ष्मी देवीची कृपा त्यांच्यावर राहिली. त्यामुळे ते मनोहर पर्रीकर यांच्यानंतर भाजपमधील सर्वांत प्रभावी नेते ठरले आहेत.
अर्थात पर्रीकर यांचा करिश्मा वेगळा होता. पर्रीकर यांचे प्रशासकीय कौशल्य, प्रामाणिकपणा, स्वच्छ कारभार हा आता इतिहास झाला आहे. मात्र, पर्रीकरांनंतर कोण असा प्रश्न सात वर्षांपूर्वी होता. पर्रीकर यांचे निधन झाले तेव्हा प्रमोद सावंत हे मंत्रिपदीही नव्हते. ते सभापती होते. भाजपमधील काही दिग्गज त्यावेळी मंत्रिपदी होते. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सावंत यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यास मान्यता दिली. त्यानंतर आपणही यशस्वी नेता होऊ शकतो हे प्रमोद सावंत यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे काही विरोधकदेखील मान्य करतील की सावंत खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले आहेत. ते नशीबवान आहेत हा भाग वेगळा, पण पर्रीकर यांच्याही कारकिर्दीत ज्या गोष्टी शक्य झाल्या नव्हत्या, त्या एक-दोन गोष्टी सावंत यांनी करून दाखवल्या हे नमूद करावे लागेल.
एखाद्या नेत्याचे अपयश किंवा कमकुवतपणा दाखवून देणे हे मीडियाचे काम असते, पण त्याच नेत्याच्या प्रबळ बाजू योग्यवेळी जगासमोर आणणे हेदेखील प्रसारमाध्यमांचे काम आहे. त्यामुळेच आम्ही म्हणतो की- कर्मचारी भरती आयोग गोव्यात कधी स्थापन होईल व गुणवत्तेच्या आधारे युवकांना नोकऱ्या मिळतील ही अशक्यप्राय बाब वाटत होती. मात्र, गेल्या वर्षभरात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाने ही अवघड व अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. इतिहासात याची निश्चितच नोंद राहील.
दुसरी बाब म्हणजे खनिज खाण भूखंडांचा लिलाव पुकारणे. खनिज खाणींचा लिलावही मार्गी लागला आणि काही प्रमाणात तरी खाण धंदा सुरू होऊ शकला. पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले असताना भाजपने लक्ष्मीकांत पार्सेकर यांना संधी दिली होती. मात्र, २०१७ साली पार्सेकर यांना भाजपला पुन्हा सत्तेवर आणता आले नाही. खुद्द पार्सेकर यांचा तेव्हा पराभव झाला आणि भाजपचे संख्याबळही तेरापर्यंत खाली आले होते. तो पक्षाचा मोठा पराभव ठरला होता. त्यामुळेच भाजपचे काही केंद्रीय नेते म्हणायचे की- २०२२ साली देखील भाजपला तेरा-चौदा जागा प्राप्त होतील. मात्र, प्रमोद सावंत व त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे या दोघांनीही तो समज खोटा ठरवून दाखवला.
भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करून दाखवले. अर्थात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनीतीनेही गोव्यातील भाजपला मोठी मदत केली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ती पहिली विधानसभा निवडणूक होती. त्या निवडणुकीत मगो पक्षासोबत युती नसतानादेखील भाजप जिंकला आणि सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. सावंत यांना त्यामुळेच पुढील पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला.
येत्या दहा-बारा महिन्यांत ते आपल्या दुसऱ्या टर्मची पाच वर्षे पूर्ण करतील. आज त्यांना मुख्यमंत्री म्हणून बरोबर सात वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या मंत्रिमंडळात दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे, आदी अनेक दिग्गजांना काम करावे लागत आहे.
'माझे घर'सारखी योजना मुख्यमंत्री सावंत यांनी तयार करून घेतली आहे. लोकांची घरे नावावर करून देण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. योजना ऐतिहासिक स्वरूपाचीच आहे. गोव्यात अनेक पायाभूत साधनसुविधांची कामे सावंत यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली. काही दिवसांपूर्वीच सावंत म्हणाले की आपल्याकडे सोशिकता आहे. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर आहे. हे एकदम खरे आहे. सावंत यांच्या रागाचा कधी कडेलोट होत नाही. त्यामुळेच ते यशस्वी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच.
Web Summary : Pramod Sawant completes seven years as Chief Minister, overcoming challenges and implementing key initiatives like the employee recruitment commission and mining auctions. Despite comparisons to Parrikar, Sawant has carved his own successful path, earning recognition for his leadership and project completion.
Web Summary : प्रमोद सावंत ने मुख्यमंत्री के रूप में सात साल पूरे किए, चुनौतियों का सामना किया और कर्मचारी भर्ती आयोग और खनन नीलामी जैसी प्रमुख पहलें लागू कीं। पर्रिकर से तुलना के बावजूद, सावंत ने अपनी सफल राह बनाई, और अपने नेतृत्व और परियोजना पूर्णता के लिए पहचान अर्जित की।