मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 18:25 IST2019-03-18T18:17:52+5:302019-03-18T18:25:14+5:30
प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते.

मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी
पणजी : प्रमोद सावंत हे अखेर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतील हे सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर स्पष्ट झाले. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. घटक पक्ष त्यामुळे सावंत यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गोव्यात असून त्यांच्यासोबत सोमवारीच सायंकाळी सात वाजेर्पयत ढवळीकर व सरदेसाई यांची बैठक होणार आहे.
प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब:याच चर्चेनंतर तयार झाला. मगोपकडे तीन आमदार असून त्या तिघांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल. गोवा फॉरवर्डच्याही तिघा आमदारांना मंत्रीपद मिळेल, असे भाजपच्या उच्चस्तरीय सुत्रंनी सांगितले. पर्रीकर सरकारमध्ये मगोपचे फक्त दोघेच मंत्री होते.
गोवा फॉरवर्ड व मगोपने जास्त ताणून धरले व भाजपशी संघर्ष केला तर गोवा विधानसभा निलंबित केली जाण्याची शक्यता होती. विरोधी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, त्या पक्षाला सरकार स्थापन करू देण्यास भाजप कधीच तयार होणार नाही याची कल्पना मगोप व गोवा फॉरवर्डलाही आली.