पूजा नाईकचा नार्को चाचणीला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:28 IST2026-03-19T09:27:27+5:302026-03-19T09:28:02+5:30
पूजा नाईकवर सध्या फोंडा, डिचोली आणि गुन्हे शाखेत अनेक गुन्हे दाखल आहेत.

पूजा नाईकचा नार्को चाचणीला नकार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील गाजलेल्या सरकारी नोकरी घोटाळ्यातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने आपली नाकों अॅनालिसिस चाचणी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गोवा पोलिसांनी या घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी आणि पैशांचा नेमका व्यवहार कोणासोबत झाला, हे शोधण्यासाठी या चाचणीची मागणी केली होती. मात्र, म्हापसा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात पूजा नाईकच्या वतीने हा नकार कळविण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा नाईकने समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून या घोटाळ्यात काही मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा केला होता. त्यावेळी तिने सत्याचा शोध घेण्यासाठी स्वतःहून नार्को चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली होती. चाचणी झाली तर सत्य समोर येईल असे तिचे म्हणणे होते.
मात्र, आता प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रियेत पोलिसांनी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर तिने आपला पवित्रा बदलला असून, संमती देण्यास नकार दिला आहे.
अनेक गुन्हे दाखल
पूजा नाईकवर सध्या फोंडा, डिचोली आणि गुन्हे शाखेत अनेक गुन्हे दाखल आहेत. फोंडा पोलिसांनी तिला म्हापसा न्यायालयात हजर करून नार्को चाचणीची मागणी केली होती. फसवणुकीचा पैसा कुठे गेला, हे शोधून काढण्यासाठी ही चाचणी पोलिसांना हवी होती, तसेच या प्रकरणाचे सूत्रधारही शोधायचे होते. मात्र, आता तिने नकार दिल्याने पोलिसांना केवळ तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही आरोपीची नार्को अॅनालिसिस, पॉलिग्राफ किंवा ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यासाठी त्या व्यक्तीची लेखी संमती अनिवार्य असते.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणावरही अशी चाचणी लादली जाऊ शकत नाही. पूजा नाईकच्या या नकारामुळे पोलिसांसमोर आता तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.