पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 08:56 IST2025-08-06T08:54:08+5:302025-08-06T08:56:21+5:30
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतापले, पर्यटनावर होतोय परिणाम.

पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पोलिसांच्या संरक्षणाखाली बेकायदेशीर कारवाया वाढत आहेत. लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, कारण ते महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी असभ्य वागतात. रात्रीच्या गस्ती कमी झाल्या आहेत. एफआयआर नोंदवण्यास विलंब होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने रेव्ह पार्टीज, वेश्या व्यवसाय, जुगार अड्डे वाढत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा अधिवेशनात मंगळवारी केली.
बलात्कार, चोऱ्या, दरोडे, खून, सायबर गुन्हे आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होत आहे. याचा पर्यटनावर परिणाम होत आहे. मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्यावसायिक कर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
योग्य व्यवस्था नसल्याने सुमारे तीन हजार डीलर्स मॅन्युअली रिटर्न सादर करतात. यामुळे जीएसटी प्रणालीचा उद्देशच हरवून जातो. सरकारने जीएसटी इंटेलिजन्स आणि डेटा अॅनालिटिकल विभाग सुरू करण्याची गरज आहे, ज्यामध्ये आधार लिंक्ड व्हेरिफिकेशन नोंदणी असेल. तसेच बनावट इनव्हॉइसिंग ओळखण्यासाठी एआय आधारित व्यवस्थेची गरज आहे, असेही युरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, 'सरकार युवकांना खेळात प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा ढासळत आहेत. क्रीडा पायाभूत सुविधांचा वापर करून नाविन्यपूर्ण मार्ग शोधला पाहिजे.
आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले की, बाणावली मतदारसंघातील सर्व रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. येथे पर्यटकांची संख्या जास्त असल्याने, सर्व रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यांनी मतदारसंघातील पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित केला आणि सांगितले की, जल विभागाकडे अनेक फाइल्स प्रलंबित आहेत.
आमदार एल्टन डिकोस्टा यांनी केपे पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची आणि गस्ती वाहनांची कमतरता याबद्दल चिंता व्यक्त केली. वाढत्या ड्रग्ज आणि जुगार कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. 'युरी म्हणाले की, गोवा स्किल्ड इंडिया मिशन साध्य करण्यात अपयशी ठरला आहे. स्थानिक नवोपक्रम, हरित उद्योग, कृषी-आधारित उपक्रम, सर्जनशील क्षेत्र आणि डिजिटल कॉमर्समध्ये तरुणांना प्रेरित करण्यात सरकार निष्क्रिय ठरले आहे.
शाळा, कॉलेजमध्येही मिळतो ड्रग्स : व्हिएगस
आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, ड्रग्ज आता शाळा, कॉलेजांमध्येही पोहोचले आहेत आणि कॉलेज कॅम्पसमध्ये विकले जात आहेत. ड्रग्जशी संबंधित वाढत्या प्रकरणांवरून असे दिसून येते की गोव्यात ड्रग्जचा धोका वाढत आहे. सर्वत्र जुगार वाढत आहे. रहिवाशांच्या अनेक तक्रारी असूनही, पोलिस जुगाराच्या कारवायांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. पोलिसांना जुगारात सहभागी असलेल्यांकडून त्यांना कमिशन मिळते असा आरोप वेंझी यांनी केला. काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी त्यांनी केली. कोलवा पोलिस स्थानकाच्या वाईट स्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. तुरुंगाच्या कॅन्टीनमध्ये मोबाईल फोनचा वापर आणि तुरुंगाच्या आवारात पाणी दूषित झाल्याची तक्रार त्यांनी केली.
अटल सेतूचे कर्ज फेडले : मुख्यमंत्री
गोव्याची आर्थिक स्थिती चांगली असून मर्यादितच आम्ही कर्ज घेत आहोत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. साडेचार हजार कोटींपर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा असतानाही केवळ १०५० कोटी रुपये कर्ज घेतले. अटल सेतूचे ११७ कोटी रुपये कर्ज सरकारने फेडले, अशी माहिती त्यांनी दिली. सांडपाणीवाहू टँकरना आता सिव्हरेज कॉर्पोरेशनकडे नोंदणी असणे आणि ओळखीसाठी रंगीत कोड असणे आवश्यक आहे. अधिसूचना जारी करण्यात आली आहे; नोंदणी नसलेल्या टँकरवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत, गोव्यात १९ टक्के मलनिस्सारण जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे, ज्यावर १,७०० कोटी खर्च झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, '१.२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर खेळांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आहे. राज्यातील युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी हा एक उत्साहवर्धक टप्पा ठरला आहे.