बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:23 IST2025-11-15T09:22:43+5:302025-11-15T09:23:56+5:30
इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.

बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बिहारच्या विकासाचा विचार करून बिहारच्या लोकांनी एनडीएला मतदान केले आहे आणि जातीय राजकारण नाकारले आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. मुख्यमंत्री सावंत यांनी काल फातोर्डा येथील दक्षिण गोवा भाजप पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि बिहार निवडणुकीत एनडीए सरकारला मिळालेल्या पूर्ण बहुमताचा आनंद साजरा केला. पक्षाच्या सदस्यांसोबत आनंद साजरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी बिहारमधील जनतेचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी जातीय राजकारण नाकारले आहे. बिहार राज्यात विकास घडवून आणणाऱ्या नितीश कुमार यांच्या एनडीए सरकारला मतदान केले आहे. यापुढे विकासाच्या आधारावरच निवडणुका लढल्या जातील. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत, उत्तर गोव्यात भाजपने २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. दक्षिण गोव्यात भाजपने १४ जागा जिंकल्या आणि युतीसह भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. यावेळीही आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्हाला दोन्ही जिल्ह्यांत पूर्ण बहुमत मिळेल,' असा दावा सावंत यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी पुरोगामी सरकारला मतदान केले आहे.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न बिहारच्या जनतेने स्वीकारले आहे आणि बिहार निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते आधी भाजपवर मतदान चोरीचा आरोप करत होते; परंतु बिहार निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारच्या जनतेने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नाकारले आहे,
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा पंचायतमंत्री, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी आपल्या समर्थकासहीत आनंदोत्सव साजरा केला. शुक्रवारी (दि. १४) नवेवाडे येथील पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून फटाके फोडून, मिठाई वाटत आनंद साजरा केला. यावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्यासह, दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अॅड. अनिता थोरात, कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक सुदेश भोसले आणि दाबोळीतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदोत्सवावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले यांना मिठाई भरवली.