एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:52 IST2025-10-01T13:51:29+5:302025-10-01T13:52:35+5:30
रामा काणकोणकर याचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्याला सर्वांसमक्ष सहा-सात जणांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले.

एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी
रामा काणकोणकर या तरुणावर झालेल्या हल्ल्याला बारा दिवस उलटले. जेनिटो कार्दोजसह काही हल्लेखोरांना पोलिसांनी लगेच अटक केली, हे स्वागतार्ह आहे. मात्र, रामाला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे. पोलिसांनी आणि इतरांनीही लपवाछपवी करू नये. पोलिसांना सर्व गंभीर प्रकारची कलमे संशयीत आरोपींना लावावी लागतील. त्यांनी जर पळवाट ठेवली तर, कायद्याच्या कचाट्यातून संशयीत आरामात सुटतील.
पूर्वीही गोव्यात हल्ला प्रकरणे झाली आहेत. त्यावेळीही आरोपी संशयाचा फायदा घेऊन मोकाट सुटलेले आहेत. अशी अनेक उदाहरणे गेल्या दहा वर्षांत आढळून येतील. गुंडगिरी आणि गुन्हेगारी त्यामुळेच वाढत आहे. काही दिवस पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीत राहणे हे गुंडापुंडांना आता रोजचेच झाले आहे. गुंडांची कातडीही काही राजकारण्यांएवढी दाट झालेली आहे. त्यामुळे ते काही दिवस तुरुंगात राहतात आणि मग जामिनीवर सुटून पुन्हा गुन्हे करायला मोकळे होतात. रामा हा सामाजिक कार्यकर्ता. अनुसूचित जमातीतील काही चळवळ्या तरुणांपैकी. रामावर हल्ला कोणत्या कारणास्तव केला गेला हे अजून उजेडात आलेले नाही.
एक राजकीय नेताच मास्टरमाइंड आहे, असा केवळ आरोप केला म्हणून होत नाही. त्या आरोपात तथ्य आहे की नाही कोण जाणे. दिवसाढवळ्या रामाला मारहाण करण्यासाठी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक पुढे आले, त्यांना शिक्षा व्हायला हवी. अन्यथा यापुढे कुणीही कुणालाही दिवसाढवळ्या बदडून काढतील. पणजी व परिसरात पूर्वी अशा प्रकारे दिवसाढवळ्या हल्ले होत नव्हते. खून करण्याच्याच हेतूने रामाला तुडविले गेले हे लक्षात येते. गंभीर जखमी झालेला रामा गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी परवा जाहीर केले की, एमआरआय स्कॅनिंगनंतर रामाच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळल्या असून त्याची दृष्टी अधू झाली आहे, डोक्याला जबर दुखापत आहे. हे दावे खरे असले तर स्थिती अतिशय गंभीर आहे.
रामा काणकोणकर याचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्याला सर्वांसमक्ष सहा-सात जणांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. पणजीत शेकडो सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते व इतरांनी मोर्चा काढून चक्का जाम केला. त्यामुळेच गोवा सरकारची यंत्रणा तात्पुरती जागी झाली. लोक शांत राहिले असते तर पोलिसांनी कदाचित हल्लेखोरांना अटकच केली नसती. लोकांच्या दबावामुळे निदान अटक तरी झाली. जेनिटो कार्दोजने पाच वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सांताक्रूझ भागात कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा दिला होता हेही जगजाहीर झालेले आहे. त्याबाबतचा व्हिडीओ पूर्वीच व्हायरल झाला आहे.
अर्थात आताच्या हल्ल्याचा विषय त्या राजकारण्याशी संबंधित नाही. मात्र, रामा काणकोणकरवर हल्ला करण्यामागे नेमका कोणता वाद कारणीभूत होता, कोणत्या प्रकरणाच्या मुळापासून वाद सुरू झाला व तो हल्ल्यापर्यंत पोहोचला हे स्पष्ट व्हायला हवे. रामा सतत वेगवेगळ्या निसर्गविरोधी प्रकल्पांविरुद्ध बोलत होता, रामाला पूर्वी धमक्या येत होत्या, हेही सर्वांना ठाऊक आहे. सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, पोलिसांनी अगोदरच रामाची काळजी घेतली असती, तर त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालाच नसता. सांतआंद्रे-सांताक्रूझ भागात अस्तित्वात असलेल्या दोन गटांच्या संघर्षातून हा हल्ला झाला आहे का, हे देखील कळण्यास मार्ग नाही. उगाच मास्टरमाइंड म्हणून कुणाकडेही बोट दाखवता येणार नाही, हेही तेवढेच खरे.
रामाने मास्टरमाइंड म्हणून अजून पोलिसांना कुणाचेही नाव दिलेले नसावे. रामाची जबानी घेण्यासाठी पोलिस इस्पितळात जातात, पण तो जबानी देत नाही, कारण तो बोलण्याच्या, जबानी देण्याच्या स्थितीत नाही, असे सांगितले जाते. आपल्यावरील खुनी हल्ल्यानंतर कुणालाही मानसिक व भावनिक धक्का बसतोच. त्यातून सावरण्यासाठीही वेळ जावा लागेल. शेवटी रामा जी वेदना भोगतोय, ती रामाला व त्याच्या कुटुंबीयांनाच कळणार. गोव्यात गुंडाराज सुरू झाले आहे, याची चाहुल यापूर्वीच लागलेली आहे. रामासाठी जे न्याय मागतात त्यांनाच समन्स पाठवून पोलिस स्थानकावर बोलविण्याचे प्रकार घडतात. ते बंद व्हायला हवे.