राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:30 IST2025-04-03T12:29:57+5:302025-04-03T12:30:52+5:30
पर्वरीत कार्यकर्ता मेळावा उत्साहात.

राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही, राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा आहे. राजकारण करणे हा आमचा व्यवसाय नाही. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी आम्ही, या तत्त्वावर आम्ही कार्य करतो. आम्ही नागरिकांसाठी, राज्यासाठी काम करतो. यासाठी अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या धोरणानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
बुधवारी (दि. २) येथील सुकूर पंचायत सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष विनीत परब, सिद्धार्थ कुंकळीकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, सरपंच सोनिया पेडणेकर, स्वप्नील चोडणकर, पंच सदस्य व भाजप मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यास सुकूर, पेन्ह द फ्रान्स आणि साल्वादोर दु मुंद पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी झटूया
आमदार रोहन खंवटे यांनी आमच्या पक्षात बिनशर्त प्रवेश केला आणि ते भाजपमय झाले, तुम्हीही त्यांना पाठिंबा दिला. आज खंवटे पर्वरी मतदारसंघात उत्साहाने विकासकामे करतात. पर्वरी मतदारसंघाचा विकास इतर मतदारसंघापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी समस्त कार्यकर्त्यांनी आणि आम्ही कार्यरत राहावयास हवे. २०२७ च्या निवडणुकीत २७ जागा निवडून आणणे हे आपले उद्दिष्ट आहे, ते साकारण्यास आपण झटूया, असे ते पुढे म्हणाले.
पक्षकार्य करा, दखल घेतली जाईल : दामू नाईक
पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी आपल्या ओघवत्या भाषणात तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष नावारूपास आला. कार्यकर्त्यांनी आवडीने काम केल्यास ते उच्च पदावर सहज पोहोचू शकतात. एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, आज भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता उच्चपदावर पोहोचू शकतो. कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाचे काम करावे, ते कधीच फुकट जाणार नाही, असे दामू नाईक म्हणाले.