विरोधकांना संधी पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:01 IST2026-01-04T14:01:02+5:302026-01-04T14:01:37+5:30

गोव्यातील सर्व विरोधकांना संघटीत होण्याची संधी आहे. सर्व विरोधक जर विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहिले तरच परिवर्तन घडविता येईल. अर्थात विरोधकांची युती होणे हे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी काही राजकारण्यांना व काही पक्षांना त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागते. एकमेकांचे पाय ओढून युती होत नसते.

opportunity for opponents in goa but | विरोधकांना संधी पण...

विरोधकांना संधी पण...

सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक, गोवा

जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण भाजपमधील कोअर टीमकडून विविध प्रकारे केले जात आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात आपण जिल्हा पंचायतीवर वर्चस्व मिळवले, याबाबत भाजपमध्ये निश्चितच समाधान व्यक्त होत आहे. उत्तर गोव्यात भाजपची कामगिरी अधिक चांगली झाली, याबाबतही अभिमान व्यक्त केला जात आहे. अर्थात सत्तरी व डिचोली तालुक्यात भाजपने प्रभाव दाखवला. बार्देश, पेडणे या तालुक्यांत किंवा तिसवाडीतही तेवढा प्रभाव दाखवता आला नाही. तरीदेखील उत्तर गोव्यात सर्वाधिक जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या. भाजपचे काही आमदार वीक विकेटवर आहेत हे दक्षिण व उत्तर गोवा अशा दोन्ही ठिकाणी पक्षाला कळून आले आहे. 

विधानसभा निवडणुकीवेळी चित्र वेगळे असते, हे जरी खरे असले तरी, भाजपच्या काही आमदार व काही मंत्र्यांना योग्य तो धडा मिळालेला आहे. शिवाय ग्लेन तिकलो, बाबू कवळेकर अशा काही माजी आमदारांनादेखील योग्य तो संदेश झेडपी निवडणुकीने दिलेला आहे. एका मंत्र्याचा उमेदवार फक्त १९ मतांनी जिंकल्याची बातमी झळकली. त्यावेळी त्या मंत्र्याने मला फोन केला आणि आपल्या विरोधात सर्व विरोधक एकवटले, त्यामुळेच असे घडले असे स्पष्टीकरण दिले. शेवटी विरोधकांनी निवडणुकीत एकत्र यायचेच असते.

विरोधक एकत्र येणार नाहीत, मगच आपण प्रचंड लिड घेऊन जिंकणार असा विचार जर आमदार व मंत्री करू लागले तर कसे होईल? यावेळच्या होडपी निवडणुकीत सर्वाधिक निधी भाजपने खर्च केला होता, तरीदेखील काही आमदार व मंत्र्यांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप घाम काढावा लागला. काँग्रेसचे नेते युरी आलेमाव किंवा अमित पाटकर हे प्रचारासाठी राज्यभर फिरले नाहीत. काँग्रेसने उमेदवार उभे केले पण पक्षाकडे निधी नसल्याने त्या उमेदवारांना पक्षाकडून फारशी मदत झाली नाही. 

काँग्रेसमध्ये आता चर्चा अशी चाललीय की पक्षाकडे निधी नव्हता आणि त्यामुळेच पक्षाचे नेते सगळीकडे प्रचारासाठी गेले नाहीत. प्रचारासाठी गेलो तर आपले उमेदवार निधी मागतील ही चिंता युरी, पाटकर वगैरेंना होतीच. अशावेळी सर्व विरोधकांनी युती करणे व प्रत्येकाने दहा-बारा जागा लढविणे हाच उत्तम पर्याय ठरतो. समजा आरजी पक्षासोबत कॉंग्रेसची युती झाली असती तर झेडपी निवडणुकीत विरोधकांच्या जागा आणखी थोड्या वाढल्या असत्या. अर्थात युती झाली नाही तरी, शिरसईमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला हे महत्त्वाचे आहे. 

कार्ल्स कालुस फरैरा यांनीदेखील आपले उमेदवार निवडून आणले. युरी आलेमाव यांनीही प्रभात दाखवला. काँग्रेसचे केप्याचे आमदार एल्टन मात्र बार्से येथे उमेदवार निवडून आणू शकले नाहीत. ते खोला झेडपी मतदारसंघात यश मिळवू शकले. नावेलीचे आमदार उल्हास नाईक, थिवीचे आमदार व मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे काही खरे नाही, असा संदेशही झेडपी निवडणुकीने दिलाय.

गोव्यात विधानसभा निवडणूक कदाचित दोन महिने अगोदरच होऊ शकते. येत्या डिसेंबरमध्येच विधानसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. विरोधकांची युती होऊ नये, विरोधक पूर्णपणे गाफील राहावेत म्हणून भाजप प्रयत्न करील. २०२६ हे वर्ष गोव्यात इलेक्शन वर्षच आहे. जरी तांत्रिकदृष्ट्या २०२७ साली सुरुवातीलाच निवडणूक होईल असे क्षणभर गृहीत धरले तरी. आता सर्वांच्याच हाती दहा ते बारा महिन्यांचा कालावधी आहे. पालिका निवडणुका होतील, त्यावेळी भाजपला जास्त संधी असेल, कारण शहरांमध्ये भाजपचे समर्थक, कार्यकर्ते व मतदार जास्त आहेत. ग्रामीण भागात तुलनेने भाजपची शक्ती कमी आहे, असे मानले जाते.

आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांसह पाँडिचेरीमध्ये येत्या मार्च ते मे या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगाल व आसाममध्ये पराभव स्वीकारण्यासाठी तयार राहा, असा टोला नुकताच गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. काँग्रेसच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झालेला आहे.

मात्र देशभरातच काँग्रेस पक्ष - सुधारण्याच्या स्थितीत नाही, हे नुकतेच दिग्विजय सिंग यांनीदेखील दाखवून दिले. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हेदेखील अधिक हट्टी व दुराग्रही झालेले आहेत. गोव्यात 'आप'ने सपाटून मार खाल्ला, त्या अपयशात केजरीवाल यांच्या धोरणाचे योगदान आहे. आम आदमी पक्षाला गोवा कळलेला नाही. झेडपीमधील पराभव लक्षात घेतल्यानंतर असे वाटते की आपचे सासष्टीतील दोन्ही आमदार आपसोबत राहाणार नाहीत. ते यापुढील विधानसभा निवडणुकीवेळी कदाचित काँग्रेसचे तिकीट स्वीकारू शकतात किंवा अपक्ष रिंगणात उतरू शकतात. 

काँग्रेसने सासष्टीत आपले स्थान बळकट केले आहे. सासष्टीत सर्वाधिक झेडपी मतदारसंघ काँग्रेस पक्ष जिंकला. रायमध्ये गोवा फॉरवर्डचा उमेदवार जिंकला. आरजी, आप यांना ख्रिस्ती मतदार व ख्रिस्ती धर्मगुरू आता जास्त साथ देत नाहीत. ते काँग्रेसला साथ देतात. मते फुटू नयेत याची काळजी बार्देश व सासष्टीतील खिस्ती मतदार घेत आहेत, असे जाणवते.

गोव्यात लोकचळवळ सुरू होऊ लागली आहे. वाढती जमीन रुपांतरणे, झोन बदल, डोंगर टेकड्या सपाट होणे किंवा शेत जमिनींची विक्री याविरुद्ध लढा उभा राहू लागला आहे. माजी मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या ६ रोजी पणजीत महत्त्वाची बैठक होईल. अशावेळी खरे म्हणजे गोव्यातील सर्व विरोधकांना संघटीत होण्याची संधी आहे. सर्व विरोधक जर विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहिले व जागा वाटप ठीक झाले तर विरोधकांना संधी आहे. 

अर्थात विरोधकांची युती होणे हे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी काही राजकारण्यांना व काही पक्षांना त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागते. विरोधकांपैकी विजय व युरीचे हवे तेवढे पटत नाही. मनोज परब आणि विजय सरदेसाई यांचेही पटत नाही. आम आदमी पक्ष अजून विरोधकांसोबत येण्यास तयार आहे असे वाटत नाही. विरोधक एकत्र आले तरच निभाव लागेल, नाही तर गोव्यात पुढील दहा ते पंधरा वर्षे भाजपकडेच सत्ता राहील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटतोय.
 

Web Title : विपक्ष को मौका, पर एकता चुनौती बनी हुई है

Web Summary : गोवा जिला पंचायत चुनावों में भाजपा का दबदबा। आंतरिक मुद्दे और विपक्ष की फूट चुनौतियां पेश करती हैं। आगामी चुनावों में भाजपा को हटाने के लिए गठबंधन महत्वपूर्ण हैं।

Web Title : Opposition Gets a Chance, But Unity Remains a Challenge

Web Summary : BJP dominates Goa Zilla Panchayat polls. Internal issues and opposition disunity pose challenges. Alliances are crucial for unseating BJP in upcoming elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.