Only ten percent of schools in Goa have toilets suitable for the Divyang | गोव्यात केवळ दहा टक्के शाळांमध्येच दिव्यांगांसाठी उपयुक्त शौचालये

गोव्यात केवळ दहा टक्के शाळांमध्येच दिव्यांगांसाठी उपयुक्त शौचालये

मडगाव - शिक्षणाच्या सुविधात अग्रेसर असल्याचा दावा करणाऱ्या गोव्यात दिव्यांगाच्या सोयीसाठी मात्र बऱ्याच कमतरता असल्याचे दिसून आले आहे. गोव्यात शाळेत जाणाऱ्या दिव्यांगाची टक्केवारी 73.4 टक्के एवढी प्रचंड असताना दिव्यांगासाठी सुलभ अशा शौचालयांची सोय असलेल्या शाळांची संख्या मात्र केवळ दहा टक्क्यांच्या आसपास असल्याचे एका राष्ट्रीय सव्र्हेक्षणात पुढे आले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक संघटनेने 'दिव्यांगांच्या संदर्भात भारतातील शिक्षण' या विषयावर 2019 चा आपला अहवाल नुकताच जाहीर केला आहे त्यात शाळेत जाणाऱ्या दिव्यांगांची संख्या देशात सर्वात जास्त गोव्यात असून त्या पाठोपाठ केरळ व महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गोव्याचे प्रमाण 73.4 टक्के असून केरळ 73.2 तर महाराष्ट्र 70.3 एवढय़ा टक्केवारीवर आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या लक्षद्वीपची टक्केवारी 69.5 तर मणिपूरची टक्केवारी 69.4 एवढी आहे.

याउलट दमण व दीव (44.5 टक्के), नागालँड (50.8 टक्के), आसाम (51.1 टक्के), राजस्थान (56 टक्के) व मेघालय (56.5 टक्के) या राज्यात शाळेत जाणाऱ्या दिव्यांगांची संख्या कमी आहे. 5 ते 19 वयोगटातील मुलांचा अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गोव्यातील ही टक्केवारी जरी देशात सर्वात वरच्या क्रमांकाची असली तरी प्रत्यक्षात अशा मुलांची संख्या मात्र इतर राज्यांच्या तुलनेत (आंकडेवारीच्या दृष्टीतून) बरीच कमी आहे. या अहवालाप्रमाणो 5 ते 19 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या दिव्यांगांचा आंकडा 5 हजारापेक्षा काहीसा जास्त आहे. इतर राज्यात मात्र विद्याथ्र्याची ही संख्या लाखोंच्या घरात आहे. आंकडेवारी गृहित धरल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्र्चिम बंगाल या राज्यातील मुलांची संख्या जास्त आहे तर कमी लोकसंख्या असलेल्या सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश व गोवा या राज्यात ही संख्या कमी आहे.

गोव्यात जरी इतर राज्यांच्या तुलनेत दिव्यांगांचा आकडा कमी असला तरी दिव्यांगांसाठी सुलभ अशी शौचालये दहा टक्क्यांपेक्षा कमी शाळांत असून, गोव्याबरोबरच अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तराखंड याही राज्यात गोव्यासारखीच स्थिती आहे.

गोव्यात शाळेची पायरी कधीही न चढलेल्या दिव्यांगांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असून, मुलींचे प्रमाण 18 टक्के तर मुलांचे प्रमाण 16.7 टक्के एवढे आहे. मात्र शाळेत जाणाऱ्या अशा विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण मुलांमध्ये जास्त (9.9 टक्के) असून मुलींमध्ये हे प्रमाण केवळ 8.7 टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Web Title: Only ten percent of schools in Goa have toilets suitable for the Divyang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.