'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:14 IST2025-12-24T10:14:17+5:302025-12-24T10:14:54+5:30
बॉडी कॅमेरा वापरणारे गोवा पहिले राज्य

'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चलन देण्याचा अधिकार केवळ बॉडी कॅमेरा लावलेल्या पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकालाच असणार आहे. अशा प्रकारे बॉडी कॅमेऱ्यांचा वापर करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
आल्तिनो येथे ४.९ कोटी रुपयांचे व्हेईकल माउंटेड जॅमर, पोलिसांसाठी बुलेट मोटारसायकल्स, ट्रक, १० टन क्रेन, बॉडी कॅमेरा यांचे मुख्यमंत्र्यांनी हिरवा बावटा दाखवून उद्घाटन केले. यानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस महासंचालक आलोक कुमार व पोलिस महानिरीक्षक के. आर. चौरसिया उपस्थित होते. नागरिकांची तसेच वाहनचालकांची सुरक्षा लक्षात घेता गोवा पोलिसांकडून वरील वाहने खरेदी करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्यात जेव्हा व्हीव्हीआयपी मान्यवर येतात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी व्हेईकल माउंटेड जॅमर, आदी यंत्रणा गोवा पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने ती भाड्याने आणली जात होती. मात्र आता गोवा पोलिसांनी ती खरेदी केली आहे. याचा नक्कीच फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चलन देण्याचे अधिकार बॉडी कॅमेरा लावलेल्या पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकालाच असतील. निरीक्षक तसेच उपनिरीक्षक रैंकच्या खालील अधिकाऱ्यांना नसेल. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने ते मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे त्यांची तसेच नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.