बगलमार्गच हवा; भोमवासीयांचा आग्रह! महामार्गाच्या आखणीवेळी अधिकाऱ्यांसोबत वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:33 IST2025-04-23T11:32:29+5:302025-04-23T11:33:03+5:30

अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात मोजणीचे काम उरकून घेतले.

only a bypass road is needed bhom residents insist argument with officials during highway planning | बगलमार्गच हवा; भोमवासीयांचा आग्रह! महामार्गाच्या आखणीवेळी अधिकाऱ्यांसोबत वादावादी

बगलमार्गच हवा; भोमवासीयांचा आग्रह! महामार्गाच्या आखणीवेळी अधिकाऱ्यांसोबत वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मंगळवारी बांधकाम खात्याचे अधिकारी व अभियंते भोम येथे दाखल झाले. त्यांनी फ्लायओव्हर नेमका कुठून व कसा जाणार याचे मोजमाप करण्यास सुरुवात केली असता, ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. आम्हाला बायपास हवा, असा आग्रह धरत ग्रामस्थ आक्रमक झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात मोजणीचे काम उरकून घेतले.

सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत संपूर्ण भोम गावात तणावपूर्ण वातावरण होते. अधिकाऱ्यांचे मोजमाप सुरू असताना ग्रामस्थही त्यांच्याबरोबर उभे होते. भोम गावातून सहापदरी रस्ता होणार आहे. त्यासाठी येथे फ्लायओव्हरच्या माध्यमातून प्रकल्प उभा राहणार आहे. मात्र ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच त्याला विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे गावातील मंदिरे जाणार आहेत, असा रेटा लावून धरला. त्यावर शनिवारी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली व मंगळवारी अभियंते प्रत्यक्ष येऊन रस्ता नेमका कुठून जाणार, फ्लायओव्हर कसा असेल याची माहिती देणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर नंतर पुन्हा एकदा ग्रामस्थांशी भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. त्यानुसार मोठ्या संख्येने ग्रामस्थ सातेरी मंदिराजवळ जमा झाले होते. सकाळी मोजमाप सुरू करताच ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जो आराखडा मंजूर केलेला आहे, तो दाखवण्याचा आग्रह केला. मात्र, तो दाखवण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली. अधिकारी पुन्हा एकदा २०१५ चा आराखडा घेऊन मोजमापे करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

मोजमाप चालू असताना ग्रामस्थ रस्त्यावर येत असल्यामुळे फोंडा ते पणजी महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्याच्या मध्ये येऊन लोक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. वाहतूक पोलिस आपल्या परीने जमेल तशी वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न करत होते. बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी आपल्या परीने लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तशाही अवस्थेत अभियंत्यांनी मात्र रेखांकन व मोजमाप चालूच ठेवले. प्रत्यक्षात तर संपूर्ण मोजमापणी झाल्यानंतर अभियंते ग्रामस्थांना सर्व काही दाखवणार होते, परंतु ग्रामपंचायतीजवळ ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले व त्यांनी बायपासचाच हट्ट लावून धरला.

सरपंचांना घेराव अन् पोलिसांची मध्यस्थी

मोजमाप करण्याचे काम सुरू असताना नवनिर्वाचित सरपंच सुनील नाईक हे सातेरी मंदिराजवळ आले असता लोकांनी त्यांना घेराव घातला. काहीजण त्यांच्या अंगावर धावून गेले. एवढी वर्षे आम्ही आंदोलन करत असताना पंचायत मात्र आमच्याविरोधात काम करत असल्याचा आरोप लोकांनी केला. ग्रामस्थ ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले त्यावेळी सरपंच त्यांच्यासोबत नव्हते. आज मोजमाप सुरू असताना सरपंच आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी सरपंचांना तिथून नेले.

आम्ही दाखवतोय तिथून बायपास करा

यावेळी संजय नाईक म्हणाले की, शेतजमिनी जाणार असल्याने सरकार बायपास नको म्हणत आहे. मात्र ज्या-ज्या जागेतून बायपासचा पर्याय आम्ही सुचविला आहे तिथे लोक कशाचीच लागवड करत नाहीत. मनोहर पर्रीकर यांनीही बायपास होणार, असे ठाम सांगितले होते. मात्र आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बायपास टाळून फ्लायओव्हरचा हट्ट धरत आहेत, हे बरोबर नाही.

चौपदरीकरणासाठी आणखी २६,३१० चौरस मीटर जमीन हवीय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फोंडा-भोम राष्ट्रीय महामार्ग ७४८च्या चौपदरीकरणासाठी चार गावांमधील २६ हजार ३१० चौरस मीटर अतिरिक्त जमीन संपादित करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली असून, हरकती व सूचना मागवल्या आहेत. ही जमीन कुंडई, कुंकळ्ये, वेलिंग व प्रियोळमधील आहे. अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत पणजीतील आल्तिनो येथील विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

 

Web Title: only a bypass road is needed bhom residents insist argument with officials during highway planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.