गोव्यात रेल्वेच्या धडकेने झारखंड येथील इसम ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:33 IST2019-01-18T21:31:19+5:302019-01-18T21:33:14+5:30
रेल्वेच्या धडकेने गोव्यात एक बेचाळीस वयाचा मूळ झारखंड राज्यातील एक इसम जागीच ठार झाला.

गोव्यात रेल्वेच्या धडकेने झारखंड येथील इसम ठार
मडगाव - रेल्वेच्या धडकेने गोव्यात एक बेचाळीस वयाचा मूळ झारखंड राज्यातील एक इसम जागीच ठार झाला. दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील बेलातेम - कुंकळळी येथे ही काल सांयकाळी पावणोसहाच्या घटना घडली. सतीश गोपे असे मयताचे नाव असून, तो कामगार म्हणून काम करीत होता. रेल्वे रुळ ओलांडताना समोरुन येणा-या रेल्वेची त्याला धडक बसली असावी असा संशय गोव्यातील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
रेल्वे स्टेशन मास्तरने या प्रकरणी मागाहून कोकण रेल्वे पोलिसांना कळविल्यानंतर संबधितांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात घडला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम आसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय राणो पुढील तपास करीत आहेत. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.