'ओंकार' पोहोचला लोकवस्तीत; सरकारने हत्तीचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:58 IST2026-04-09T06:57:48+5:302026-04-09T06:58:52+5:30
मोपा परिसरातील शेतकरी चिंतेत

'ओंकार' पोहोचला लोकवस्तीत; सरकारने हत्तीचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: ओंकार हत्ती मागील चार दिवसांपासून कडशी-मोपा परिसरात शेती, बागायतीचे नुकसान करण्याबरोबरच आता चक्क लोकवस्तीत घुसत असून, लोकांचाही पाठलाग करत आहे. हत्ती लोकवस्तीत फिरत असल्यामुळे भीतीने होणाऱ्या धावपळीत एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पंच दयानंद गवंडी यांनी उपस्थित केला आहे. त्याबरोबरच सरकारने लवकरात लवकर प्रशिक्षित माहुत आणून या हत्तीचा बंदोबस्त करावा. तसेच नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
ओंकार हत्तीने मागील चार दिवसांपासून कडशी-मोपा परिसरात ठाण मांडले आहे. शेती-बागायतीचे नुकसान करत असताना आता चक्क घराच्या पडवीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तो नेमका कुठे जाईल, याचा अंदाज घेणे कठीण बनत असल्याने त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हंगामी पिकांना धोका
शेतकरी आणि पंच दयानंद गवंडी म्हणाले की, मागच्या वेळी तांबोसे-तोरसे भागात हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. सध्या पुन्हा एकदा मोपा परिसरात ओंकार हत्तीचे आगमन झालेले आहे. तो पुन्हा तांबोसे-उगवे परिसरात आला तर या शेतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेले पालेभाजी, मिरची यासारख्या हंगामी पिकांची नासधूस करण्याची शक्यता आहे. या पिकांची नासधूस करायला हत्ती मागे-पुढे पाहणार नाही. त्यामुळे त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारने हत्तीचा बंदोबस्त करावा : कोपरगावकर
ओंकार हत्ती पुन्हा एकदा मोपा गावात धुमाकूळ घालून नुकसान करत आहे. त्यामुळे सरकार याचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी केली आहे. या हत्तीला पकडून सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याऐवजी वन खात्याचे अधिकारी फक्त पाळत ठेवतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहतात. या हत्तीला प्रशिक्षित कामगारांना आणून पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज आहे. मोपा, तांबोसे, तोर्से, पत्रादेवी आदी भागांत या हत्तीने लोकांचे नुकसान केले आहे. सरकारने हत्तीचा बंदोबस्त करून पेडणेतील लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.