'ओंकार'कडून वाहनांचीही नासधूस; बागायतीचीही हानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:01 IST2025-12-04T12:00:42+5:302025-12-04T12:01:26+5:30
ओंकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात वास्तव्य करतो आणि सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो लोक वस्तीमध्ये प्रवेशतो.

'ओंकार'कडून वाहनांचीही नासधूस; बागायतीचीही हानी
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : तीन दिवसांपूर्वी राज्यात प्रवेश केलेल्या ओंकार हत्तीने बागायतीची नासधूस करण्याबरोबरच आता वाहनांचीही नासधूस करायला सुरुवात केली आहे. हत्तीने दोन दिवसांपूर्वी तीन वाहनांची नासधूस केली. काल, बुधवारी पहाटे एक कारची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.
ओंकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात वास्तव्य करतो आणि सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो लोक वस्तीमध्ये प्रवेशतो. या ठिकाणी कवाथे, पोफळीची नासधूस त्याने सुरूच ठेवली आहे. आता ओंकार हत्तीने वाहनांकडे लक्ष वळवले आहे. हत्तीचा वनखात्याने जर वेळेत बंदोबस्त केला नाही, तर उगवेवासीयांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार आणि वनखाते पूर्ण जबाबदार असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
तिसऱ्याही दिवशीही ओंकारने उगवे परिसरात ठाण मांडून नासधूस करायला सुरुवात केली. हत्तीने अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. हत्तीच्या पाठीमागे फिरण्याशिवाय किंवा तो कुठे जातो, याची माहिती घेण्यापलीकडे हे अधिकारी, कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. सरकारने प्रशिक्षित कर्मचारी आणून हत्तीला पकडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.