आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:08 IST2026-03-30T08:07:52+5:302026-03-30T08:08:15+5:30
गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) या प्रकरणाचा तपास सोपवल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे.

आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कुडचडे येथील बहुचर्चित सोहम नाईक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला असून, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या इलेक्ट्रॉनिक धागेदोऱ्यांमुळे संशयित सोहमचे अनेक मित्र आता पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांचीही धरपकड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) या प्रकरणाचा तपास सोपवल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे. पोलिसांनी सोहमच्या जप्त केलेल्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) आणि इतर तांत्रिक माहिती मिळविली आहे. यावरून सोहम कोणाकोणाच्या संपर्कात होता आणि त्याचे नेमके व्यवहार काय होते, याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. लवकरच त्याच्या काही मित्रांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
मोबाईलचे फॉरेन्सिक विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संवादाची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. पीडित मुलींच्या जबान्या नोंदवून घेण्यासोबतच, या जाळ्यात ओढल्या गेलेल्या इतर मुलींचा शोध घेतला जात आहे.
विशेषतः सोहम नाईकच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि चॅट्सच्या माध्यमातून ठोस पुरावे गोळा करण्यावर तपास अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोण आहेत का? त्यादृष्टीनेही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. सध्या सोहम पोलिस कोठडीत आहे.
...तर आज पाचवा गुन्हा
या प्रकरणात तीन पीडित मुली तक्रार नोंदविण्यासाठी पुढे आल्यानंतर आणखी पीडिता पुढे येऊ लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने शनिवारी येऊन सोहमने केलेले कारनामे सांगितले आहेत. पोलिसांनी तिला तक्रार नोंदविण्यासही सांगितले आहे. तक्रार नोंदविल्यानंतर सोमवारी या प्रकरणात सोहमवर पाचवा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.