दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 08:54 IST2025-08-04T08:54:09+5:302025-08-04T08:54:09+5:30

एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल.

now pay rs 1600 for instant duplicate copy of 10th and 12th certificate fees increased | दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेची डुप्लिकेट प्रमाणपत्रे आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी शुल्क वाढविले आहे. जर एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. त्यास शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल.

गोवा शालान्त मंडळाने दहावी आणि बारावीच्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. परीक्षांसाठी दुरुस्ती, डुप्लिकेट कागदपत्रे, विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्र पडताळणीशी संबंधित अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी शुल्कात सुधारणा केली आहे. सुधारित शुल्क रचना तत्काळ लागू करण्यात आली आहे. नवीन शुल्क प्रणालीत शोध शुल्क हा नवा प्रकार लागू करण्यात आला आहे. नवीन शुल्क प्रणालीची माहिती विद्यालयांकडून नोटीस बोर्डवर लावली जावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

उत्तीर्ण प्रमाणपत्रांची डुप्लिकेट प्रत हवी असेल आणि अर्ज केल्यानंतर आठ दिवसांत ती हवी असतील तर त्यासाठी ४०० रुपये प्रति प्रमाणपत्र अधिक १०० रुपये प्रत्येक वर्षासाठी शोध शुल्क आकारले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जर एखाद्या व्यक्तीला केलेल्या अर्ज दिवशीच जर उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत हवी असेल तर १५०० रुपये तत्काळ शुल्क आणि १०० रुपये दर वर्षासाठी शोध शुल्क आकारले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुणपत्रिकेची डुप्लिकेट प्रत

दरम्यान, गुणपत्रिकेसाठी ८ दिवसांनंतर प्रति प्रमाणपत्र ४०० रुपये मोजावे लागतील. याचबरोबर तसेच दर वर्षासाठी १०० रुपये शोध शुल्क आकारले जाईल असे याबाबतच्या परीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एखाद्याला त्याच दिवशी डुप्लिकेट गुणपत्रिका हवी असेल तर त्याला १२०० रुपये तत्काळ शुल्क आणि प्रत्येक वर्षासाठी १०० रुपये शोध शुल्क भरावे लागेल. त्यामुळे जर जुनी गुणपत्रिका हवी असेल तर या शुल्काची एकत्रित रक्कम वाढू शकते.

गरज किती आहे, यावर भरा शुल्क

गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या डुप्लिकेट प्रती ८ दिवसांत हव्या असतील तर ४०० रुपये दर प्रमाणपत्राला आणि १०० रुपये दर वर्षासाठी शोध शुल्क आकारले जाईल. या प्रती त्याच दिवशी हव्या असतील तर त्यासाठी १६०० रुपये तत्काळ शुल्क आणि १०० रुपये दर वर्षासाठी शोध शुल्क आकारले जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

चुकांची दुरुस्ती शुल्क

जर एखाद्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे जारी केल्याच्या पहिल्या वर्षात त्यात दुरुस्ती करायची असेल तर प्रती प्रमाणपत्र ३०० रुपये शुल्क असेल. ५ वर्षांच्या आत दुरुस्तीसाठी प्रति प्रमाणपत्र ६०० रुपये तर जारी केल्याच्या ५ वर्षांच्या आत दुरुस्ती करण्यासाठी ६०० रुपये शुल्क आणि प्रत्येक वर्षासाठी २०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

 

Web Title: now pay rs 1600 for instant duplicate copy of 10th and 12th certificate fees increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.