विधानसभेवर परिणाम नाही: दामू नाईक; जि. पं. निवडणुकीत जनतेचा कौल भाजपलाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:02 IST2025-12-25T11:01:16+5:302025-12-25T11:02:06+5:30
दक्षिण गोव्यात मताधिक्य वाढले

विधानसभेवर परिणाम नाही: दामू नाईक; जि. पं. निवडणुकीत जनतेचा कौल भाजपलाच
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या काही मंत्री व आमदारांना धक्का बसला व त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. मात्र याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नसून उलट या निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस सर्वानंद भगत व रुपेश कामत उपस्थित होते.
भाजप व मगोच्या युतीला २०२७च्या विधानसभा निवडणुकीत ३० हून जास्त जागा प्राप्त होतील, असा विश्वास आहे. झेडपीत आमदार उल्हास नाईक तुयेकर, मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.
२०२० साली झालेल्या झेडपी निवडणुकीत भाजपला ३९ टक्के मते मिळाली होती. तर या निवडणुकीत ४०.९६ टक्के मते मिळाली. काही मंत्री, आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार पडले असले तरी एकूणच निकाल पाहिला तर लोकांचा कल हा भाजपाच्या बाजूने असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट होते.
दरम्यान, त्यांनी निवडणुकीमध्ये पक्षाला जास्तित जास्त जागा जिंकून देण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे कौतूक केले.
त्यांना स्वप्ने पाहू द्या : दामू
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २७ जागांवर विजय मिळवणार, असा जो दृढ विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, त्यांना फक्त स्वप्नेच पाहत राहू द्या, आम्ही व्यावहारिकदृष्ट्या काम करत राहू. आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर आहोत.
पक्षविरोधी काम केल्याची तक्रार नाही
जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात काम केल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचा आरोप काहीजण करत आहेत. मात्र तसे काहीच नसून आमच्याकडे पक्षाविरोधी काम केल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही. जर काही जणांनी तसे विधान केले असेल तर निकालानंतरची त्यांची ती प्रतिक्रिया असेल. मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पीएने सांताक्रूझ मध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचाही आरोप होत असून त्याबाबत आपल्याला काहीच ठाऊक नाही, असेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
सासष्टीत मते वाढली
सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांनी भाजपला नाकारले असे म्हटले जात आहे. मात्र तसे नाही. उलट तेथे देखील पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. मगोचे आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाजपसोबत युती केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत २२ हून जागा मिळतील असे विधान केले आहे. मात्र त्यापुढे जाऊन सदर युतीला ३० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास आपल्याला आहे. जनता आमच्या कामावर खुश असल्याचे नाईक यांनी सांगितले.
विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे : पालेकर
झेडपी निवडणुकीत आपच्या खराब कामगिरीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर म्हणाले की, भाजपला हरवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विरोधी पक्षांनी एकत्र येणे. विरोधकांच्या मतांच्या विभाजनाच्या भीतीमुळे लोकांनी 'आप'ला मतदान केले नसेल.
युती काही जणांना नकोच होती : एल्टन यांचा निशाणा
काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणूक इतर राजकीय पक्षांसोबत युती करून लढायला हवी होती, परंतु काही लोकांना ते होऊ द्यायचे नव्हते, असा आरोप करीत काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी निशाणा साधला आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल पाहता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे ही काळाची गरज आहे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे. निकालांचे विश्लेषण केल्यास काँग्रेस केपे विधानसभा मतदारसंघात १,२०० मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट होते. आम्ही यामध्ये केपे शहर जमेस धरलेले नाही. जर केपे शहराचा समावेश केला तर आघाडी ४,००० पेक्षा जास्त होईल. जिल्हा पंचायत निवडणुकीने हे सिद्ध केले आहे की, २०२७ च्या निवडणुकीत काँग्रेस केपे मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवेल.