मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 07:17 IST2026-01-30T07:17:58+5:302026-01-30T07:17:58+5:30

आज आगमन : जनआंदोलनांचे विषय बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता

nitin nabin will interact with ministers and mla of goa | मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे आज, शुक्रवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत असून त्यांच्या आगमनामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोव्यातील मंत्री, आमदारांशी व भाजप कोअर टीमशी नितीन नबीन हे संवाद साधतील. नबीन यांच्यासोबत पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. गोव्यात अलिकडे वाढत असलेल्या जनआंदोलनांबाबतची माहिती नितीन नबीन यांना काहीजणांकडून दिली जाईलच. बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युनिटी मॉलविरोधी आंदोलन अजून सुरूच आहे. तुये येथील इस्पितळाच्या मुद्द्यावरूनही आंदोलन व त्याशिवाय न्या. फर्दिन रिबेलो यांची जनचळवळ अशा विषयांवरून काही आमदार व मंत्र्यांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. काही आमदार थोडे नाराज असल्याने तेही बोलू शकतात. नितीन नबीन यांना याची कल्पना गोवा भेटीवेळी येईलच. नबीन यांचे आज सकाळी १० वाजता दाबोळी विमानतळावर आगमन होईल. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वास्कोचे आमदार दाजी साळकर विमानतळावर त्यांचे स्वागत करतील. आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक मजबुतीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यावर त्यांचा या दौऱ्यात विशेष भर असेल.

राज्यातील विविध मतदारसंघांतील पक्षकार्याचा आढावा ते घेतील. तसेच स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि पक्ष आणखी बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

नबीन हे आमदार, मंत्र्यांच्या बैठका घेतील. उद्या, शनिवारी सकाळी १० वाजता ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा असून या मेळाव्याला तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग हे काल गोव्यात दाखल झाले. त्यांनी दौऱ्याच्या तयारीचा एकूण आढावा घेतला. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर नबीन यांची ही पहिलीच गोवा भेट असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
 

Web Title : मंत्री, विधायकों से नबीन गोवा में करेंगे संवाद

Web Summary : भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन गोवा में मंत्री, विधायकों और पार्टी कोर टीम के साथ बातचीत करेंगे। आगामी चुनावों से पहले राजनीतिक रणनीति, संगठनात्मक मजबूती और जनसंपर्क पर ध्यान केंद्रित किया जाएगा।

Web Title : Nabin to interact with ministers, MLAs in Goa visit.

Web Summary : BJP National President Nitin Nabin is visiting Goa to engage with ministers, MLAs, and the party's core team. Discussions will focus on political strategy, organizational strength, public relations, and addressing local issues ahead of upcoming elections.