गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 05:37 IST2025-12-08T05:35:39+5:302025-12-08T05:37:23+5:30
सुरक्षा नियम धाब्यावर; मुख्य सरव्यवस्थापकासह चौघांना अटक, सरपंचही ताब्यात; आगीच्या चौकशीचे आदेश; बाहेर पडताच न आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू; क्लबला परवानगी नसल्याचा आरोप; क्लब मालकावर गुन्हा

गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
म्हापसा : पणजीपासून २५ किमी अंतरावरील हडफडे-बागा भागातील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मध्ये शनिवारी ११.४५ च्या सुमारास भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला. या आगीने काही क्षणांत रौद्ररुप धारण करून संपूर्ण परिसराला घेरले. या दुर्दैवी घटनेत २५ पैकी २३ जणांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. तर दोघे आगीत होरपळले. सहा जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. या घटनेतील सर्व मृतांची ओळख पटली आहे.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी कल्बचे मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोडक (४९), गेट मॅनेजर प्रियांशू ठाकूर (३२), बार मॅनेजर राजवीर सिंघानिया (३२) आणि सरव्यवस्थापक विवेक सिंग (२७) यांना अटक केली आहे. तर मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा (रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चार पर्यटक दिल्लीतील एकाच कुटुंबातील असून एक पर्यटक कर्नाटकातील आहे. अन्य २० जण क्लबमधील कर्मचारी असून यात उत्तराखंड (५), नेपाळ (४), झारखंड (४), आसाम (४), महाराष्ट्र (१), उत्तर प्रदेश (१), प. बंगालचे (१) रहिवासी आहेत. या सर्वांची ओळख पटली आहे.
मृतांना २ लाख, जखमींना ५० हजार
हडफडे येथील अग्नितांडवात मृत झालेल्याच्या नातेवाईकांना २ लाख रु. मदत दिली जाणार आहे. तर जखमींना ५० हजार रु. दिले जाणार आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून ही मदत दिली जाणार आहे.
गोव्यातील हडफडे येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना मी प्रार्थना करतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सुरक्षा नियम धाब्यावर बसवून क्लबची रचना...
तीन वर्षांपूर्वी हा क्लब सुरू झाला होता. ज्या जागेवर हा क्लब आहे त्या ठिकाणी मिठागरे होती. तरीही तिथे क्लब उभारण्यात आला. क्लबची उभारणी पाण्यात व काही अंशी लाकडाचा वापर केल्याने बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग केला होता.
त्याला जोडून तळमजल्यावर किचन होते. आगीच्या धुराचे लोळ तळमजल्यात शिरले. त्यामुळे किचनमध्ये असणारे कामगार आतच अडकले व धुरामुळे अनेकजण गुदमरून दगावले. किचनलाही एक्झिट सुविधा नसल्याने अडचणीत जास्त भर पडली.